'अंतर शंभर मीटर, वेळ २५ मिनिटे'; ताथवडे-पुनावळे भुयारी मार्गासह सेवा रस्त्यावर खड्डेच खड्डे, पर्याय नसल्याने रोजच वाहतूक कोंडीचा त्रास

मुंबई - बेंगलोर महामार्गावरील ताथवडे - पुनावळे भुयारी मार्गासह सेवा रस्त्यावर पाणी साचून प्रचंड खड्डे तयार झाले आहेत. हिंजवडी आयटी पार्ककडे जाण्यासाठी नागरिक याच रस्त्याचा वापर करत असून तेथे प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

संग्रहित छायाचित्र

मुंबई - बेंगलोर महामार्गावरील ताथवडे - पुनावळे भुयारी मार्गासह (Tathawade - Punawale Underpass) सेवा रस्त्यावर पाणी साचून प्रचंड खड्डे तयार झाले आहेत. हिंजवडी आयटी पार्ककडे जाण्यासाठी नागरिक याच रस्त्याचा वापर करत असून तेथे प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या भुयारी मार्गाचे  शंभर मीटर अंतर पार करण्यास तब्बल २० ते २५ मिनिटे लागत आहेत. त्यामुळे दररोज होणा-या वाहतूक कोंडीचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महापालिका हद्दीतील वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरात नागरिकांचे वास्तव्य वाढत आहे. त्या भागात गृहनिर्माण प्रकल्प मोठ्या प्रमाणात होत असून हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीला जाणाऱ्या नागरिकांना वाकड, ताथवडे, पुनावळे हे ठिकाण वास्तव्यास सोयीचे आहे. या परिसरात चोहोबाजूंनी शेकडो सदनिकांच्या गृहप्रकल्पातून हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीस जात आहेत. दररोज ताथवडे - पुनावळे अंडरपासमधून नागरिकांची ये - जा सुरू असते. वाकड किंवा रावेतकडे जाणा-या अनेक आयटी व्यावसायिकांसह इतराना हा भुयारी मार्ग वापरणे हा एकमेव पर्याय आहे. 

ताथवडे - पुनावळे अंडरपास (भुयारी मार्ग) सेवा रस्त्यावर खोदकाम, खड्डे झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वास्तविक पाच मिनिटांच्या भुयारी मार्गावर नागरिकांना २० ते २५ मिनिटे लागत आहेत. पर्यायी मार्गही नसल्याने अंडरपासवर वाढत्या वाहतूक कोंडीने रस्ते त्रस्त होत आहे. महामार्गाच्या सेवारस्ता आणि अंडरपास सायंकाळी सहानंतर वाहनांच्या रांगा लागत असून सेवारस्त्यावर वाहतुकीचा ताण येऊन वाहतूक कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी भुयारी मार्गावर पाणी साचून जागोजागी खड्डे देखील पडले आहेत.

दरम्यान, ताथवडे, पुनावळे, वाकड परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पिंपरी चिंचवड महापालिका अधिका-यांकडे त्यांच्या संबंधित पोर्टलवर वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. या ठिकाणी अनेकदा मनुष्यबळ तैनात केले तरी अंडरपास (भुयारी मार्ग) पुरेसा रुंद नाही. त्यामुळे अनेक अडथळे निर्माण होत असून तेथील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

तसेच वाहतूक कोंडी, पायाभूत सोयी, सुविधा, वेगवेगळ्या सुधारणा करण्यास पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका अधिकारी यांनी या मार्गाची एकत्रित पाहणी करावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अंतर्गत येणारा १२ मीटर लांबीचा रस्ता दुरुस्त करण्याबाबत मनपा आयुक्तांकडे घेतलेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांवर अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे सदर भुयारी मार्गासह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, वारजे यांच्याकडे उपाययोजना करण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे.

वाहतूक पोलीस हतबल

हिंजवडी आयटी पार्ककडे जाणा-या नागरिकांना ताथवडे - पुनावळे अंडरपास भुयारी मार्ग हा एकमेव पर्यायी मार्ग आहे. दररोज होणा-या वाहतूक कोंडीने नागरिक हतबल झाले आहेत. वाकड वाहतूक पोलीसदेखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून कधी-कधी ही कोंडी आवरणे त्यांनाही अवघड होत आहे. शाळा, काॅलेज, आयटी पार्क व लहान-मोठ्या कंपन्या सुटण्याच्या वेळेत सर्वांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दररोज होणारी  वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलीसदेखील हतबल झाले आहेत.

उपाययोजना करा -आश्विनी जगताप 

ताथवडे - पुनावळे भुयारी मार्ग आणि सेवा रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सेवा रस्ता, अंडरपास येथील खड्डे बुजविण्यात यावेत. भुयारी मार्ग, सेवा रस्ता तातडीने दुरुस्त करावा. किवळे ते बालेवाडी काॅरिडाॅर प्रस्तावित प्रकल्पाचे मंजूर डिझाईनबाबत नागरिकांच्या हरकती, सूचनांकरिता लवकर उपलब्ध करण्यात याव्या. भुयारी मार्ग व सेवा रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपल्या स्तरावर योग्य त्या  उपाययोजना कराव्यात, असे पत्र चिंचवडच्या आमदार आश्विनी जगताप यांनी प्रकल्प संचालकांना दिले आहे. 

"महापालिकेच्या वाहतूक व नियोजन विभागाला ताथवडे - पुनावळे भूयारी मार्गावरील वाहतूक कोडी सोडवण्यासाठी सेवा रस्त्यावर असणारे अतिक्रमण हटवण्याच्या सूचना पत्राद्वारे अधिका-यांना दिल्या आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून भुयारी मार्गातून जाणारी  अवजड वाहतूक देखील बंद केलेली आहे. त्याशिवाय वाहतूक पोलीस, वार्डन यांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे."
- विशाल गायकवाड, डीसीपी, वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड पोलीस

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest