वाकड येथील गणेशनगर भागात तीन महिन्यांपूर्वी एक इमारत रात्री अचानक एका बाजूने झुकली
विकास शिंदे -
वाकड (Wakad) येथील गणेशनगर भागात तीन महिन्यांपूर्वी एक इमारत रात्री अचानक एका बाजूने झुकली. नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यामुळे ही महापालिका प्रशासनाने जमीनदोस्त केली. परंतु, प्रकरणाचे गांभीर्य नसल्यामुळे बिल्डर, आर्किटेक्ट आणि अधिकारी कोणालाही यासाठी जबाबदार धरले गेले नाही.
कोणतीही कारवाई न करता पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अशा गंभीर प्रकरणात पालिकेकडून बिल्डर, आर्किटेक्टच्या चुकीला माफी देत आहे का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाकड येथील गणेशनगर (Ganesh Nagar) रस्त्यावरील दुर्गा कॉलनीत एका तीन मजली इमारतीचे बांधकाम परवानगी घेऊन सुरू होते. मात्र, या इमारतीत जागा सोडली. ती एका बाजूने झुकली. ती कधीही पडू शकते, अशी स्थिती निर्माण झाली.
त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी पाहणी करून ही इमारत धोकादाक असल्यामुळे पाडण्याचा निर्णय घेतला. काही तासांनंतर ही इमारती जमीनदोस्त करण्यात आली. बांधकाम परवानगी दिलेली इमारत अशा पध्दतीने पाडावी लागण्याचा ही शहरातील पहिलीच घटना असावी. त्यावेळी या इमारतीची बांधकाम परवानगी, संपूर्ण प्रक्रिया याची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर सुमारे तीन महिने उलटून प्रशासनाने या प्रकरणी ठोस कारवाई केलेली नाही.
बांधकामात काही त्रुटी असल्यामुळे इमारत पाडावी लागली, असे अधिकारी सांगतात. मात्र, बांधकामाची रचना करणारे आर्किटेक्ट, परवानगी देणारे अधिकारी व संबंधित बांधकाम व्यावसायिक यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली
नाही.तर, पोलिसांकडे तीन वेळा तक्रार केली. परंतु, पोलीस कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करायचा, अशी विचारणा करत गुन्हा दाखल करत नसल्याचे पालिका अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे या घटनेला प्रशासनाने अद्याप कोणाला जबाबदार धरलेले नसून कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही.
··बांधकाम व्यावसायिकाला वाचवण्याचा प्रयत्न ?
बांधकाम परवानगी विभागाशी संबंधित हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट यांच्यासह महापालिकेतील बांधकाम परवानगी देणा-या संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द देखील कारवाई होऊ शकते. हे प्रशासनातील सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे केवळ कागदी घोडे नाचवून आणि वेळकाढूपणा करून कारवाई टाळण्याचा प्रकार प्रशासनाकडून सुरू आहे. परिणामी, या प्रकरणात नेमकं कोण कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागलेला आहे.
"वाकडमध्ये गणेशनगर भागात एक इमारत रात्री अचानक एका बाजूने झुकली. नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यामुळे ही महापालिका प्रशासनाने जमीनदोस्त केली. या प्रकरणात बिल्डर, आर्किटेक्ट वर पोलिसांकडे तीन वेळा तक्रार केली. परंतु, पोलीस कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करायचा, अशी विचारणा करत गुन्हा दाखल करत नाहीत."
- सुनील बागवानी, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.