'होर्डिंग पडले तर आमची जबाबदारी नाही'; होर्डिंगमालकाने 'फलक' लावून झटकली जबाबदारी!
आकुर्डी खंडोबा माळ चौकात इमारतीवर उभारलेला होर्डिंगला महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. एकाच इमारतीवर दोन ते तीन होर्डिंगचे स्ट्रक्चरल उभारले आहेत. विशेष म्हणजे हे होर्डिंग सिग्नलवर उभारले असून ते धोकादायक आहे. चुकून जरी होर्डिंगचे स्ट्रक्चरल पडले सिग्नलवर थांबलेल्या टू व्हीलर व फोर व्हीलर वाहनावर पडू शकते. तरीही संबंधित मालकाने फलक लावून होर्डिंगखाली कोणीही उभे राहू नये, काही इजा आणि जीवितहानी झाल्यास आमची जबाबदारी नाही, असा फलक लावला आहे. त्यामुळे सिग्नलवर होर्डिंग पडले तर मालकाची की महापालिकेची जबाबदारी?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात आयनाॅक्स चित्रपटगृहाकडून आलेल्या रोडवर सिग्नलवरच्या इमारतीवर तीन ते चार होर्डिंग उभारण्यात आले आहे. त्या इमारतीवर होर्डिंग उभारण्यास महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून परवानगी दिलेली आहे. मात्र, सिग्नलवर उभारलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल खूपच मोठे आहे. इमारतीचा आधार घेऊन हे होर्डिंग स्ट्रक्चरल लावले आहे. शहरात अनेक मंजूर केलेल्या फलकांचे नूतनीकरण करताना स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सादर केलेले असले तरीही अपघाताच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो, तसेच अनेकदा जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते. याबाबत महापालिकेने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
वादळी वाऱ्यात होर्डिंग पडून घाटकोपरला तब्बल १६ लोकांचा मृत्यू झाला. तर गतवर्षी किवळे या ठिकाणी होर्डिंग पडून चार लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूवी मोशी येथील होर्डिंग पडून टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांचे नुकसान झाले. तर पुण्यात देखील होर्डिंग पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
दरम्यान, संबंधित होर्डिंगमालकांने सूचना फलक लावून थेट जबाबदारी झटकली आहे. हा जाहिरात फलक महापालिकेकडून परवानगी घेऊन लावला आहे. कोणीही या बोर्डखाली थांबू नये. वादळ वाऱ्याचे दिवस आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे कोणाला काही इजा किंवा जीवितहानी झाल्यास आमची जबाबदारी राहणार नाही, असे सूचना फलक लावून नागरिकांना थेट मृत्यूच्या दाढेत टाकले आहे. त्यामुळे होर्डिंगमालक हे सिग्नलवर होर्डिंग स्ट्रक्चरल उभारून ते धोकादायक असतानादेखील महापालिकेकडून परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे सिग्नल होर्डिंग पडून होणाऱ्या जीवित व वित्तीय हानीस महापालिका आणि होर्डिंगमालक जबाबदारी झटकू लागल्याचे दिसून येत आहे.
होर्डिंगमालकाचा अंगचोरपणा
महापालिका हद्दीमध्ये जाहिरात फलकधारकांनी उभारण्यात आलेल्या फलकांचे स्ट्रक्चर मजबूत आहे. याची खातरजमा करणे बंधनकारक आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस वादळ, वारा मोठ्या प्रमाणावर येत असतो. अशा प्रकारच्या वादळ वाऱ्याने कुजलेली, गंजलेली, कमकुवत अशा प्रकारचे जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडून जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत. जर स्ट्रक्चर कमकुवत असेल तर ते तत्काळ हटवण्यात यावे. वादळ, वारा, जोरदार पावसाने स्ट्रक्चर पडून जीवित, वित्तहानी झाल्यास त्याला जाहिरात फलकधारकास जबाबदार धरण्यात येणार आहे. असे महापालिकेकडून संबंधित मालकांना ठणकावून सांगितले आहे. तरीही होर्डिंगमालक हे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत.
महापालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग काढण्यास सोमवारपासून सुरुवात करत आहेत. स्ट्रक्चरल आॅडिट न केलेल्या सर्व होर्डिंग्ज अनधिकृत समजण्यात येतील. त्या होर्डिंगधारकास नोटीस देऊन तत्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येईल. सिग्नलवरील धोकादायक, वाहतूक अडथळा ठरणाऱ्या होर्डिंग्जवरदेखील कारवाई करण्यात येईल.
- चंद्रकांत इंदलकर, सह-आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.