पिंपरी-चिंचवड: शहरात मोठ्या प्राण्यांसाठी शवदाहिनी तयार

पिंपरी-चिंचवड शहरात पाळीव प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. दर महिन्याला साधारण ३५ ते ४० मोठे प्राणी दहनासाठी येतात. त्यामुळे ही संख्या मोठी असून शहरात अद्ययावत शवदाहिनी यंत्राची आवश्यकता होती. पाळीव प्राण्यांमध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा या प्राण्यांसाठीदेखील दहन यंत्र असावे, अशी नागरिकांची मागणी होती.

संग्रहित छायाचित्र

दरमहा ३५ ते ४० मोठ्या प्राण्यांचे होते दहन, मोठ्या प्राण्यांसाठी दहनयंत्राची सोय, दहनासाठी पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात येण्याची गरज नाही

विकास शिंदे -

पिंपरी-चिंचवड शहरात पाळीव प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. दर महिन्याला साधारण ३५ ते ४० मोठे प्राणी दहनासाठी येतात. त्यामुळे ही संख्या मोठी असून शहरात अद्ययावत शवदाहिनी यंत्राची आवश्यकता होती. पाळीव प्राण्यांमध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा या प्राण्यांसाठीदेखील दहन यंत्र असावे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार महापालिकेने अद्ययावत आणि पर्यावरणपूरक यंत्र बसवण्यात येत असून मशिन सीएनजी गॅसवर चालवण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नेहरुनगर येथे प्राणी शुश्रूषा केंद्रात (ॲनिमल शेल्टर हाऊस) भटक्या आणि पाळीव प्राण्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राणी शुश्रूषा केंद्राच्या माध्यमातून पाळीव, भटक्या श्वानांना उपचार दिले जातात. याच ठिकाणी श्वानांसाठी दहन यंत्र बसवण्यात आले आहे. मात्र, मोठ्या प्राण्यांसाठी अशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे ते प्राणी पुण्यातील दहनयंत्रामध्ये पाठवण्यात येत होते. आता शहरातील मोठ्या प्राण्यांसाठी दहनयंत्राची सोय करण्यात आली आहे. मोठ्या पाळीव प्राण्यांसाठीचे दहन मशिन बसवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

या मशिनमध्ये दहनासाठी प्राण्यांच्या वजनानुसार वेळ लागणार आहे. साधारण तीन तासांत मोठ्या प्राण्याचे दहन होईल, महापालिकेच्या नेहरुनगर येथील प्राणी शुश्रूषा केंद्रात आता मोठ्या प्राण्यांसाठीही दहनयंत्राची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. दरम्यान, एका वर्षात अडीच हजार श्वानांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. असे पशुवैद्यकीय विभागाच्या अधिका-यांकडून सांगण्यात आले.

वर्षात अडीच हजार श्वानांचे दहन

नेहरुनगर येथील ५० किलो वजन क्षमता असलेल्या शवदाहिनी यंत्रात २०२३ मे ते एप्रिल २०२४ पर्यंत दोन हजार ५८० श्वानांचे दहन करण्यात आले. यामध्ये पाळीव आणि रस्त्यावरील श्वानांचा समावेश आहे. मे २०२३ मध्ये यंत्रामध्ये बिघाड झाल्याने श्वानांसाठीचे नवीन यंत्र बसविण्यात आले होते.

शहरात दरमहा ३५ ते ४० मोठ्या प्राण्यांचे दहन होते. त्या प्राण्यांना पुण्यातील मोठ्या शवदाहिनीत दाखल करून अंत्यसंस्कार करण्यात येत होते. पण, आता एक हजार किलो क्षमतेचे मोठ्या पाळीव प्राण्यांसाठीचे दहन यंत्र बसविण्यात आले आहे. त्याची चाचणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत मोठ्या प्राण्यांचे दहन सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest