संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात सध्यस्थितीत केवळ २८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जूनअखेर पुरेल एवढाच आहे. गतवर्षीपेक्षा धरणातील पाणीसाठा यावेळेस कमी झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास शहरावर आणखी पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील साडेचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराची सध्याची सुमारे ३० लाख लोकसंख्या आणि भविष्यातील ३० वर्षातील लोकसंख्या वाढीचा विचारात घेऊन पालिकेने आंद्रातून शंभर एमएलडी व भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्यात येत आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून केवळ ५० एमएलडी पाणी निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत आहे.
तसेच पवना धरणात सध्या २८ टक्के पाणीसाठा असून हा साठा जून अखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला ३०.९२ टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, पवना आणि आंद्रा धरणातील पाणी जूनअखेर पुरेल एवढा उपलब्ध आहे. पण, जूननंतर पावसाने ओढ दिल्यास शहरावर पाणी कपातीचे संकट येणार आहे. त्यावेळेस निश्चितपणे पाणी कपात करावी लागेल. तसेच शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते. प्रतिमाणसी दरडोई १३५ लिटर या निर्धारित मानकाप्रमाणे पाणी दिले जाते. ज्यांना जास्त पाणी लागते, ते खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी घेत आहेत.
दिवसाला ६१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा
महापालिका दिवसाला पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) १५ असे ६१५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. तरीही संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. सध्याची पाण्याची स्थिती पाहता २०२५ पर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा करावा लागणार आहे. भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम सन २०२५ पर्यंत पूर्ण होईल. तोपर्यंत पाणी पुरवठा एक दिवसाआडच सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा प्रशासनाने स्पष्ट केले आहे
पवना धरणात २८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जून महिन्यात पावसाला विलंब झाल्यास पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते. शहरी भागात पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
-रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण
पवना व आंद्रा धरणातून पाणीपुरवठा सुरू असल्याने अजूनही पाणीपुरवठा दिवसाआड पण सुरळीत सुरू आहे. धरणातील पाणी कमी झाल्यास निश्चितपणे आणखी पाणी कपात करावी लागेल. विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत काही तक्रारी नाहीत. जूनमध्ये तक्रारी वाढू शकतील. पाणीपुरवठा विस्कळीत झाला तरच टँकरद्वारे पाणी दिले जाते. जास्तीचे पाणी लागते म्हणून खासगी गृहनिर्माण संस्था टँकरद्वारे पाणी घेतात.
- श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.