अखेर 'सारथी'चे संकेतस्थळ सुरळीत; ऑनलाइन अपॉइंटमेंट सुरू झाल्याने वाहनचालकांना मिळाला दिलासा
पंकज खोले -
प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (RTO) विविध कामे सुलभ होण्यासाठी कार्यान्वित असलेले 'सारथी' संकेतस्थळ गेल्या चार दिवसांपासून बंद होते. शनिवारी (१८ मे) ते सुरू झाल्यानंतर अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. संकेतस्थळ सुरू झाल्याने नवीन शिकाऊ, पक्का वाहन परवाना काढणे, परवाना नूतनीकरण, परवान्याची दुसरी प्रत काढणे आदी कामे सुरू झाली आहेत. दरम्यान, 'सीविक मिरर'च्या माध्यमातून या वृत्ताची दखल घेतल्याने पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील ड्रायव्हिंग स्कूलचालकांनी आभार व्यक्त केले.
परिवहन विभागाच्या 'सारथी' (Sarthi) संकेतस्थळाची सेवा बुधवारपासून अखंडित होत होती. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी १६ ते १८ मे पर्यंत बंद करण्यात आले. याबाबत संकेतस्थळावर संदेश प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक कार्यालयात शिकाऊ आणि पक्का वाहन परवाना काढण्यासाठी आलेल्यांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांना त्या दिवशी पुन्हा पाठवण्यात आले होते. त्यामुळे या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील ड्रायव्हिंग स्कूलचालकांनी देखील आरटीओचे कारभारावर टीका केली. प्रत्यक्षात एक ते दोन दिवस अगोदर सांगणे अपेक्षित असताना, थेट सेवा बंद करणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत स्कूलच्याचालकांनी आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील संपर्क केला होता. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही.दरम्यान, तीन दिवस संकेतस्थळ बंद असल्यामुळे नवीन शिकाऊ, नव्याने अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. पक्का वाहन परवाना काढणे, परवाना नूतनीकरण, डुप्लिकेट परवाना काढण्याचे काम ठप्प झाले होते. नागरिकांना वाहन परवाना काढण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेता येत नव्हती. शनिवारी सकाळी ११ नंतर सारथी संकेतस्थळ सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
निवडणुकीनंतरही आरटीओचे कामकाज स्लो
राज्यातील चौथ्या टप्प्यातील निवडणुका नुकताच संपल्या. यामधील प्रामुख्याने पुणे, बारामती आणि मावळ या तिन्ही लोकसभा अंतर्गत निवडणुकीच्या विविध कामांसाठी आरटीओचे अधिकारी व कर्मचारी नेमले होते. मात्र, निवडणूक संपून एक आठवडा पूर्ण होईल. मात्र तरीही अद्याप आरटीओचे कामकाज पूर्वपदावर आले नाही. त्यामुळे वाहन परवान्यासह अनेक अर्ज प्रलंबित राहिले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.