File Photo
राज्याच्या नकाशावर असलेला आयटी पार्क म्हणून हिंजवडी, मान हा परिसर ओळखला जातो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा परिसर पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. राज्य शासनाचे महत्त्वाच्या विभागापैकी एमआयडीसी, पीएमआरडीए आणि हिंजवडी ग्रामपंचायत या तिन्ही विभागाचे नियंत्रण असलेल्या हिंजवडी परिसरात अनेक विकासकामे होऊ शकलेली नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधी, उपमुख्यमंत्री यांच्या बैठका होऊनही समस्या सुटलेल्या नाहीत. पायाभूत सुविधांबरोबरच वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक आणि कचरा प्रश्न भेडसावत आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांनीच याबाबत पुढाकार घेतला असल्याचे दिसून येते.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो उभारली. मात्र, हिंजवडी, माण, कासारसाई या महत्त्वाच्या गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरवलेल्या नाहीत. एकूणच मुळशी तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते, आवश्यक ठिकाणी साकव पूल, व कासरसाईसारख्या अल्प उत्पन्न असलेल्या गावांमध्ये ड्रेनेज लाईनची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था उभी करणे अजून जमले नाही.
याबाबत स्थानिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नगर परिषदेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हिंजवडीमध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज सारख्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. मेट्रोसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आलेला आहे.
मात्र, स्थानिक सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारणासाठी उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. वाहतूक कोंडी समवेत अनेक प्रकल्प आणि उपाययोजना करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. मात्र त्यानंतरही देखील याबाबत सुधारणा झाले नसल्याचे दिसून येते. कचरा व्यवस्थापनाबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याचे नियोजन होते. त्याचप्रमाणे त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, हिंजवडी व लगतच्या गावामध्ये देखील उपाययोजना करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. घोटवडे, शेळकेवाडी, पिंपळोली, कासारसाई येथील विकास कामांना प्राधान्याने निधी द्यावा व प्राधिकरणाने नागरिकांच्या सोयीसाठी हद्दीतील रस्त्यांची कामे तातडीने करणे आवश्यक असल्याचे असून, त्या संबंधित त्वरित कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या परिसरातील ग्रामस्थ, नगर परिषद आणि पदाधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी. प्रत्येक विकास कामांमध्ये स्थानिकांची मते विचारात घेण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या समस्या सुटणार नाहीत.
पाण्यामधून करावा लागतो धोकादायक प्रवास
घोटवडे ते आंधळे रस्त्यावरील पिंपळोली बसस्टॉपजवळ असलेल्या ओढ्यावर पूल करण्यात यावा, पावसाळ्यात सद्यस्थितीत असलेल्या ओढ्यावर पावसाच्या पाण्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. त्यामुळे खांबोली, कातरखडक, आंधळे या गावातील नागरिकांचा संपर्क तुटतो, पाण्यामुळे ओढ्यातून प्रवास करता येत नाही संपूर्ण रिहे खोऱ्यातील दळणवळण बंद होते. येथे ओढ्यावर साकव पूल बांधला अशी मागणी ग्रामस्थांची असून याबाबत पीएमआरडीए आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे बाबा शेळके यांनी दिली.
ग्रामस्थांचे आयुक्तांना साकडे
कासारसाई, येथे साईनगरमध्ये ३०० घरांसाठी सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने तेथे ड्रेनेज तसेच सिमेंट काँक्रिटचा रस्ता करणे अत्यंत गरजेचे आहे. या विकासकामांना निधी देऊन प्राधिकरणाने हद्दीतील गावांचा विकास साधण्यासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी कासारसाईचे माजी सरपंच आनंद लाटे यांनी केली.
रस्त्याची दूरदशा, कोणी घेईना जबाबदारी
हिंजवडी, मारुंजी, नेरे, कासारसाई, मान या गावाला जोडणाऱ्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. मात्र, ते दुरुस्त करण्यासाठी कोणीही येत नाही. नेरे, मारुंजी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. रस्ता नसूनही ईमेलच्या इमले चढवले जात आहे. त्यातच विजेची समस्या आणि वाहतूक कोंडी या भेडसावत आहे. परिणामी, त्याची कोणीही जबाबदार घेत नसल्याने स्थानिकांचे प्रश्न सुटले जात नाहीत.