निगडी प्राधिकरणात विजेचा लपंडाव; महावितरण अधिकाऱ्यांना विचारला जाब, दिला आंदोलनाचा इशारा

निगडी प्राधिकरण परिसरात दररोज वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. दिवसातून किमान तीन ते चार वेळा वीजपुरवठा बंद होत आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या उकाड्याने नागरिक त्रस्त असताना त्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत प्राधिकरणातील नागरिकांनी थेट महावितरण कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तत्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 29 May 2024
  • 12:36 pm
power supply off

निगडी प्राधिकरणात विजेचा लपंडाव; महावितरण अधिकाऱ्यांना विचारला जाब, दिला आंदोलनाचा इशारा

रोज तीन ते चार वेळा होतोय वीजपुरवठा खंडित

विकास शिंदे
निगडी प्राधिकरण परिसरात दररोज वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. दिवसातून किमान तीन ते चार वेळा वीजपुरवठा बंद होत आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या उकाड्याने नागरिक त्रस्त असताना त्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत प्राधिकरणातील नागरिकांनी थेट महावितरण कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तत्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे.  

प्राधिकरणातील महावितरण कार्यालयात मंगळवारी (२८ मे) नागरिकांनी थेट जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच यावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे, अनुप मोरे, ॲड. अर्जुन दलाल, ॲड. प्रतिभा जोशी, सुनील मडकीकर, प्रवीण अग्रवाल, कृषांक पटेल, निगडी प्राधिकरण रेसिडेंट फाउंडेशनचे सदस्य आणि प्राधिकरणातील नागरिक उपस्थित होते. कार्यकारी अभियंता देवकर यांनी नागरिकांचे निवेदन देण्यात आले. निगडी प्राधिकरण परिसरात दररोज वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. जीर्ण आणि कमी दाबाच्या केबल, विजेची वाढती मागणी यामुळे हे प्रकार सातत्याने घडत आहेत. महावितरण, महापालिका प्रशासनाने एकत्रित याकरिता उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी निगडी प्राधिकरण रेसिडेंट फाउंडेशनच्या वतीने सातत्याने केली जात आहे.

सतत खंडित होणारा वीजपुरवठा, महावितरण कार्यालयातून नागरिकांना मिळणारी उद्धट उत्तरे, वीज बिल थकले तर कनेक्शन कापण्याची धमकी अशा अनेक तक्रारी नागरिकांनी यावेळी मांडल्या. अधिकाऱ्यांनी पुढच्या तीन दिवसात इतर कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडचणी का येत आहे, हे समजून घेऊन परत नागरिकांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र मागील अनेक वर्षांपासून ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे निगडी प्राधिकरण रेसिडेंट फाउंडेशनमधील नागरिकांनी काचघर चौक, प्राधिकरण येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक मारत कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला. जर महावितरणकडून परिसरात सर्व घरांना वीजपुरवठा करण्यासाठी योग्य साधने नाहीत, तर नवीन बांधकामांना परवानगी का दिली जाते. तसेच महापालिकेने नवीन बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी मूलभूत सुविधा पुरवता येतील का? याबाबत आढावा घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

निगडी प्राधिकरण परिसरात सद्यस्थितीत असलेल्या अनेक वीजवाहिन्या अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यांची क्षमता कमी आहे, तर दुसरीकडे निगडी प्राधिकरण परिसरात सध्या अनेक ठिकाणी रीडेव्हलपमेंट सुरू आहे. पालिकेकडून बहुमजली इमारतींना परवानगी दिली जात आहे. मात्र या इमारतींना वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा पुरविल्या जातील का, याबाबत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. हाच प्रकार स्थानिकांच्या पथ्यावर पडत आहे. विजेची मागणी वाढल्याने दररोज तीन ते चार वेळा हमखास वीजपुरवठा खंडित होत आहे.
- ॲड. अर्जुन दलाल, नागरिक

निगडी प्राधिकरण परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होतो, वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त असून त्यात महावितरण कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा जर कुठलाही तोडगा निघाला नाही, तर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.

- अनुप मोरे, भाजप युवा नेते, प्राधिकरण निगडी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest