दादागिरी, गुंडगिरी अन् भयमुक्त भोसरीचा संकल्प
महाविकास आघाडी विधानसभेच्या जागा वाटपाचे धोरण करण्यापूर्वीच भोसरीमध्ये पक्षांतर सुरू झाले. त्यामुळे आक्रमक झालेल्या भोसरी विधानसभेतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेत भोसरीला दादागिरी, गुंडगिरी आणि भयमुक्त करण्याचा संकल्प यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जेजुरीतील खंडेरायाचे दर्शन घेऊन विजयी संकल्पाचा भंडारा उधळला. शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, तुषार सहाणे, संतोष वाळके, सचिन सानप, युवराज कोकाटे, नेताजी काशीद, अनिल सोमवंशी, रावसाहेब थोरात, शैलेश मोरे , दादा नरळे , ऋषिकेश जाधव, राहुल भोसले, नितीन बोंडे, सर्जेराव कचरे, स्वप्नील रोकडे, आशाताई भालेकर, प्रदीप सकपाळ, बाटे काका, शंकर चव्हाण, रमेश पाटोळे, योगेश जगताप, जनाबाई गोरे, दमयंती गायकवाड, अजिंक्य उबाळे, अमित शिंदे, अनिकेत येरुणकर, सुहास तळेकर, किशोर शिंदे, नरेंद्र पाटील, कुश कोकाटे आदी उपस्थित होते.
दरम्यान, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचे सांगत या पदाधिकाऱ्यांनी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे घातले.
भोसरी विधानसभा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. कट्टर शिवसैनिकांनी लोकसभेत आपली कामगिरी चोख बजावली. त्यामुळे येथे 'तुतारीचा आवाज' घुमला. आता भोसरी विधानसभेत शिवसेनेची मशाल पेटावी अशी आमची आग्रही मागणी आहे. पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमची मागणी मांडली. त्यांच्याकडून आम्हाला योग्य त्या सूचना मिळाल्या असून आम्ही तयारीला लागलो आहे.
- सुलभा उबाळे, शिवसेना जिल्हा संघटक, (उबाठा)