File Photo
महापालिकेच्या विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा या दर्जेदार असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या रुग्णालय आणि दवाखान्यात वर्षभरात ओपीडीमध्ये १६ लाखांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले. तर ८९ हजारांहून अधिक गंभीर रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले. पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत तब्बल पावणे नऊ लाखांनी वाढली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विकसित होत असून ३० लाखांहून अधिक लोकसंख्या वर पोहोचली आहे. एकीकडे महागाईच्या काळात वैद्यकीय सेवा, उपचार सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
मात्र, पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस दर्जेदार होत आहेत. वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये ९ रुग्णालये, ३० दवाखाने, १२ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र, ६ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कुटुंब नियोजन केंद्र, ३६ लसीकरण केंद्र सुरू आहेत. ७५० खाटांचे सर्वात मोठे वायसीएम, ४०० खाटांचे थेरगाव रुग्णालय, १०० खाटांचे नवीन भोसरी, १३० खाटांचे नवीन आकुर्डी रुग्णालय, १२० खाटांचे नवीन जिजामाता यासह १ हजार ५८ खाटांची व्यवस्था महापालिकेच्या रुग्णालयात आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक यंत्रसामग्री, उत्तम दर्जाची सेवा, साफ-सफाई ही उत्तम दर्जाची आहे.
शहर परिसर, जिल्ह्यासह राज्यभरातील रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांत बाह्यरुग्ण विभागात ७ लाख ४७ हजार ५५, आंतर रुग्ण विभागात ४३ हजार ९८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. २०२२-२०२३ मध्ये यामध्ये वाढ होऊन बाह्य रुग्ण विभागात ११ लाख ९५ हजार ५३७, आंतर रुग्ण विभागात ७५ हजार ५३८ तर २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात यामध्ये माेठी वाढ हाेऊन बाह्य रुग्ण विभागात १६ लाख १० हजार ४२ तर आंतर रुग्ण विभागात ८९ हजार ४१७ रुग्णांनी उपचार घेतले आहेत.
आरोग्य वर्धिनी केंद्र, आपला दवाखाना सुरू
महापालिकेने सीएसआरच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील वैद्यकीय पायाभूत सुविधांचे मेडिकल गॅप ॲनालिसिस केले आहे. महापालिकेच्या वतीने शहरात ८ ते १० हजार लोकसंख्या असलेला भाग, झोपडपट्टी, दाट मनुष्यवस्ती, चाळी, १ किलोमीटर अंतरावर महापालिका रुग्णालय, दवाखाना उपलब्ध नाही, अशा ठिकाणी आराेग्य वर्धिनी केंद्र, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले जात आहेत. यामुळे शहरातील नागरिकांना लहान-मोठ्या आजारांवर घराजवळ तत्पर उपचार मिळण्यास फायदा होणार आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सर्व आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र, आता २०२१ मध्ये महापालिकेने चार मोठी रुग्णालये उभारून यामध्येही सर्व आजारांवर अत्याधुनिक यंत्रणेसह उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच भविष्यात ६७ आराेग्य वर्धिनी केंद्र आणि ३३ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्याचे नियाेजन आहे. २०० बेडचे नवीन तालेरा रुग्णालय, माेशीच्या रुग्णालयाचे काम सुरू आहे. जुन्या तालेरा रुग्णालयात बर्न वाॅर्ड सुरू करण्याचे नियाेजन आहे.
- डाॅ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.