उशिरापर्यंत चालणाऱ्या हाॅटेल, बारचे परवाने रद्द करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस प्रस्ताव पाठविणार
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
पिंपरी-चिंचवड शहरात नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. आता अशा हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारचा परवाना रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
खासकरून वाकड, हिंजवडी आणि रावेत भागातील हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू राहात असल्याचे निरीक्षण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. तसेच शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी विकेंडला लेट नाईट हॉटेल्समधून बाहेर पडणाऱ्यांमुळे अनेक गुन्हे घडत आहेत. अपघात, हाणामाऱ्या, मुलींची छेडछाड, रात्री सुरू असणाऱ्या दुकानदारांना शस्त्राच्या धाकाने लुटण्याचे प्रकार घडले आहेत.
मध्यंतरी पिंपरी गावातील एका मेडिकल शॉपमध्ये सशस्त्र टोळक्याने हल्ला चढवित लूटमार केली होती. काही ठराविक मेडिकल शॉप २४ तास चालविण्यास परवानगी आहे. परंतु, मेडिकल शॉप व्यतिरिक्त अन्य दुकाने, हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बार हे जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरू राहात आहेत.
शहरातील उच्चभ्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी, पिंपळे सौदागर, वाकड, रावेत या भागांतील अनेक हॉटेल्स हे रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले जात आहेत. तसेच पिंपरी कॅम्प परिसरातील काही हॉटेल्सदेखील उशिरापर्यंत सुरू असतात. त्याचबरोबर एकंदरित शहरातील अनेक भागात खाद्यपदार्थ, आईस्क्रीम पार्लर, हुक्का पार्लर हे उशिरापर्यंत सुरू ठेवली जात आहेत. हुक्का पार्लरला परवानगी आहे की नाही, यावरून यापूर्वीच वाद झाले आहेत.
शहरात २४ तासांत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा आढावा नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या मासिक बैठकीत घेण्यात आला होता. तेव्हा रात्री घडलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी ६० टक्के गुन्हे हे उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या हॉटेल्स आणि अन्य आस्थापनांमुळे घडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सर्वप्रथम शहरातील विविध व्यावसायिकांना जिल्हाधिकारी आणि अन्य तत्सम यंत्रणांनी ठरवून दिलेल्या वेळेनंतर सर्व दुकाने बंद करण्याचे काम हाती घेण्यात आले.
गेल्या आठवडाभरात रात्री साडेदहानंतर सुरू राहणारी सर्व प्रकारची दुकाने पोलिसांनी बंद करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रात्री घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात का होईना, घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता सरसकट सर्वच व्यावसायिकांना नियमानुसार सांगितलेल्या वेळेनंतर दुकाने बंद करण्यास सांगितले जात आहे. यासाठी सर्व वरिष्ठ निरीक्षकांना रात्री बारापर्यंत आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरून दुकाने बंद करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता जी दुकाने, हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बार उशिरापर्यंत सुरू राहात आहेत, त्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश सर्व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.