पिंपरी-चिंचवड पुण्याच्या वाटेवर

वाहतूक कोंडीबाबत पुण्याने जगभर लौकिक कमावला आहे. त्या तुलनेत लगतचे पिंपरी-चिंचवड तसे कोंडीमुक्त होते. प्रशस्त्र रस्ते, फ्लाय ओव्हर, ग्रेड सेपरेटर, तुलनेने कमी वाहने आणि त्यातच केलेल्या वाहतूक नियोजनामुळे पिंपरी -चिंचवडने आपली वेगळी ओळख राखली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत वाहतूक नियोजन फसले आहे हिंजवडीबरोबर वाकड, पिंपरी, चिंचवड, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, तळवडे, भोसरी-मोशी-चाकण रस्ता, तळेगाव-चाकण रस्त्यावर कायमच वाहनांची कोंडी पाहायला मिळते. पिंपरी-चिंचवड आता पुण्याच्या वाटेने जात असल्याच्या स्पष्ट खुणा जागोजाग दिसत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 9 Mar 2023
  • 11:36 am
पिंपरी-चिंचवड पुण्याच्या वाटेवर

पिंपरी-चिंचवड पुण्याच्या वाटेवर

उद्याेगनगरीचे ५० वर्षांचे नियोजन १० वर्षांत फसले, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी दिले रोड मॅपिंगचे आदेश

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

वाहतूक कोंडीबाबत पुण्याने जगभर लौकिक कमावला आहे. त्या तुलनेत  लगतचे  पिंपरी-चिंचवड तसे कोंडीमुक्त होते. प्रशस्त्र रस्ते, फ्लाय ओव्हर, ग्रेड सेपरेटर, तुलनेने कमी वाहने आणि त्यातच केलेल्या वाहतूक नियोजनामुळे पिंपरी -चिंचवडने आपली वेगळी ओळख राखली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत वाहतूक नियोजन फसले आहे हिंजवडीबरोबर वाकड, पिंपरी, चिंचवड, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, तळवडे, भोसरी-मोशी-चाकण रस्ता, तळेगाव-चाकण रस्त्यावर कायमच वाहनांची कोंडी पाहायला मिळते. पिंपरी-चिंचवड आता पुण्याच्या वाटेने जात असल्याच्या स्पष्ट खुणा जागोजाग दिसत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रोड मॅपिंगच्या कामाला सुरुवात केली आहे .      

शहरातील वाहतूक समस्येने गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच आवश्यक नियोजन आराखडा  तयार करण्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरुवात केली आहे. पुण्यातील अरुंद रस्ते, विकासकामे आणि प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे सतत टीकेचे धनी होणाऱ्या पुणे पोलिसांकडे पाहून पुण्याला ठेच पिंपरी चिंचवड शहाणे अशी काहीशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी ते निगडी हा ग्रेडसेपरेटर (समतल विलगक) सोडला तर सध्या अनेक भागात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. हिंजवडी, वाकड, तळवडे, भोसरी-मोशी-चाकण रस्ता, तळेगाव-चाकण रस्ता, पिंपरी कॅम्प अंतर्गत बाजारपेठ रस्ता, रहाटणी कोकणे चौक परिसर आणि काळेवाडी बीआरटी मार्गावर सध्या वाहनांची मोठी कोंडी होत आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीचे हॉट स्पॉट असलेल्या शिवाजी रस्ता, स्टेशन रोड, कॅम्पमधील गांधी रोड, बाजीराव रोड, कर्वे रोड, नळ स्टॉप, सिंहगड रोड, चांदणी चौकातील कोंडी आणि रस्त्यावरील कोंडी यात फार फरक असल्याचे दिसत नाही.     

वर्दळ वाढली

शहरातील एमआयडीसी, खासगी कॉलेज, बहुराष्ट्रीय कंपन्यांना भेट देण्यासाठी येणारे राज्य - देशपातळीवरील नेते, व्हीव्हीआयपींच्या वाढत्या वर्दळीमुळे शहर कायमच वाहनांनी गडबजलेले असते.

राजकीय कार्यक्रमांसाठी नेतेमंडळी सातत्याने शहरात येत असून, त्यांच्यामुळे  सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना दररोज करावा लागत आहे. हा वाहतूक कोंडीचा प्रश्न हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांकडून वाहतुकीचा  आराखडा तयार केला जात आहे.

 स्मार्ट सिटीच्या नावाखाली...

पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी चिंचवड मधील रस्ते तसे बरेच मोठे आहेत. मात्र, रस्त्यांचे पूर्वीचे नियोजन चांगले केले असले तरी सध्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली फुटपाथ मोठे केले जात असून, रस्ते लहान होत आहेत. याबाबत नागरिकांकडून काही सूचना, तक्रारी केल्या जात आहेत. या एकंदर परिस्थितीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नुकतीच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त विवेक पाटील, डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने आणि १४ वाहतूक विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

मॅपिंगला सुरुवात 

बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर  वाहतूक पोलीस ॲक्शन मोड मध्ये आले आहेत. शहरातील कायम गर्दी होणारी ठिकाणे, नेहमी वर्दळ कमी असलेलं रस्ते, कोंडी झाल्यानंतर त्याला जोडून असलेले पर्यायी मार्ग, फक्त दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी असलेले रस्ते आणि अवजड वाहनांसाठी शहराच्या बाहेरून जाणाऱ्या मार्गाला जोडणारे अंतर्गत मार्ग यांचे मॅपिंग वाहतूक विभागाकडून केले जात आहे.

अतिक्रमण हटवणार 

पिंपरी, भोसरी, काळेवाडी, चिंचवड तसेच एकंदरीत बाजारपेठ असलेल्या भागातील अतिक्रमण  काढण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. नियमभंग करणाऱ्या सरकारी वाहनांवर कारवाई केली जाणार असून, नियम सर्वांना सारखेच असल्याचा संदेश नागरिकांना देण्याचा यामागील हेतू आहे. महामार्गावरील अनेक हॉटेल, ढाबा चालकांनी रस्ता दुभाजक आपल्या सोयीनुसार धोकादायक पद्धतीने तोडून ठेवला आहे. ग्राहकांना रस्ता ओलांडून हॉटेलात येण्यासाठी करण्यात आलेली ही बेकायदेशीर सोय बंद करण्यात येणार असून, संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

पर्यायी रस्ते वापरणार 

नेहमी एखादा चौक कोंडीत अडकत असल्यास तेथील वाहतूक अन्य कोणत्या पर्यायी मार्गाने टप्याटप्याने वळवता येईल याचा अभ्यास वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने हे करत आहेत. दापोडी ते मोशी या भागातील रस्त्यांवर प्रवासाला सरारी किती वेळ लागतो आणि तो कमी कसा करता येईल हे प्रत्यक्ष प्रवास करून उपायुक्त विवेक पाटील अहवाल तयार करीत आहेत. प्रत्येक प्रमुख चौकाला जोडलेल्या अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण, फुटपाथ आणि वर्दळीचा  आराखडा बनविण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. एखादा चौक सातत्याने वाहतूक कोंडीत अडकत असल्यास तेथील वाहने अलीकडील दोन तीन चौकातून अन्यत्र वळविता येतील का हा पर्याय तपासण्यात येत आहे.

वाहतूक नियमांकडे लक्ष 

नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी कृतीबंध आराखडा तयार करतानाच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिला जाणार आहे. विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, फुटपाथावरून वाहने चालविणे, चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क करणे, सिग्नल न पाळणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबविणे, विना हेल्मेट आणि सीट बेल्ट शिवाय वाहने चालवण्यााबाबत वाहचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

अंधाराचा महामार्ग 

राष्ट्रीय महामार्गाच्या देहू रोड-कात्रज बायपासवरील पाषाण, बाणेर, सूस रोड, नवले ब्रिज, कात्रज, आंबेगाव भागात पथदिवे नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते. नागरिकांनी तक्रार केली तर राष्ट्रीय महामार्ग महापालिकेकडे तर पालिका वीज मंडळाकडे बोट दाखवते. लोकांचे आयुष्य कायमचे अंधकारमय करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना ?

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story