प्रदूषणामुळे टाटा मोटर्सला पिंपरी-चिंचवड पालिकेची नोटीस

टाटा मोटर्स कंपनीतील प्रकल्पामुळे वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार आल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 31 Mar 2023
  • 05:28 pm
प्रदूषणामुळे टाटा मोटर्सला पिंपरी-चिंचवड पालिकेची नोटीस

प्रदूषणामुळे टाटा मोटर्सला पिंपरी-चिंचवड पालिकेची नोटीस

परिसरात रसायनमिश्रित वास येत असल्याची नागरिकांची तक्रार; तीन दिवसांत उपाययोजना करण्याची सूचना

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

टाटा मोटर्स कंपनीतील प्रकल्पामुळे वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार आल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली आहे.

शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरातील नागरिकांनी रसायनमिश्रित उग्र वास येत असल्याची तक्रार महापालिकेच्या सारथी पोर्टलवर केली होती. फेब्रुवारी महिन्यात याबाबत तक्रार आल्यावर हा वास कोठून आणि कोणत्या कंपनीतून येत आहे हे स्पष्ट होत नव्हते.

त्यामुळे शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरातील नागरिक, महापालिका अधिकारी आणि कंपनीतील कामगार यांची एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर आणि मटेरियल गेट, टेल्को रोड ते महापालिका आयुक्त बंगला या भागात जाऊन पाहणी केली होती.

मात्र, त्यावेळेस उग्र वास कोठून येतो हे स्पष्ट झाले नव्हते. त्यानंतर फेब्रुवारीअखेर पुन्हा असाच वास येऊ लागल्याने वरील समितीने पुन्हा सर्व परिसराची पाहणी केली होती. तेव्हा कंपनीच्या पेंट शॉपमधून येणारा वास आणि परिसरातील उग्र वास हा एक सारखा असल्याने महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली होती. त्यानंतर आता पुन्हा महापालिकेने नोटीस बजावून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत काय उपाययोजना केली, याची विचारणा केली आहे.

पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्मरणपत्र देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासावर तीन दिवसांत उपाययोजना करण्याची सूचना करून तसा अहवाल महापालिकेने टाटा मोटर्स कंपनीकडून मागवला आहे. इंद्रायणी आणि पवना नदी पात्रातील प्रदूषणामुळे जलचरप्राणी मृतावस्थेत आढळून येण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मध्यंतरी मृत माश्यांचा खच या नदी पात्रानजिक साचल्याने दुर्गंधी पसरली होती. प्रदूषण नियामक मंडळाकडे एमआयडीसी परिसरातील तक्रारी होत असतात. पर्यावरणप्रेमींनी नदी प्रदूषणाबाबत यापूर्वी अनेक आंदोलने केली आहेत. कंपनीतील उग्र वासामुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका मोठा आहे.

पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून आसपासच्या नागरिकांना याचा नेहमी त्रास होत असतो. उद्योजक संघटनांनी प्रदूषणाच्या मुद्यावर यापूर्वी तोडगा काढण्यासाठी एक संयुक्त बैठक घेतली होती. परंतु, त्यानंतर आता थेट टाटा मोटर्ससारख्या बड्या कंपनीबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केल्याने अन्य कंपन्यांच्या बाबतीत हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. रसायनमिश्रित पाणी थेट नदी-नाल्यात सोडणे, कंपनीतील मोठा आवाज, पेंट शॉपमधील उग्र वास या तक्रारी सातत्याने होत असताना दुसरीकडे लहान-मोठ्या उद्योजकांच्या प्रश्नावरही मतमतांतरे आहेत.

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरातील कंपनीबाबत नागरिक तक्रारी करू लागल्याने उद्योगविश्वात देखील नाराजीचा सुर उमटत आहे. उत्पादन विभागामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी अनेक बड्या कंपन्यांमधील संबंधित विभाग विशेष काळजी घेत असल्याची व्यवस्थापनाची भूमिका आहे. त्याच बरोबर नागरिकांच्या काही ठराविक भागाबाबत तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करण्यास संबंधित कंपन्या आवश्यक उपाययोजना करण्यास तयार असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story