Pune Metro : दप्तरदिरंगाईत मेट्रोचा फेज-२ अडकला

पुणे शहरातील मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आले असून दुसऱ्या टप्प्यातील काम सुरु होणे अपेक्षित होते. मात्र महामेट्रोने ८२.५ किलोमीटर अंतराच्या मेट्रो फेज-२ चा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सप्टेंबर २०२२ मध्येच पुणे महानगरपालिकेला सादर केला आहे. महापालिकेने हा अहवाल राज्य सरकारला सादर करणे आवश्यक आहे. मात्र, हा अहवाल अजूनही महापालिकेच्या कक्षेतच अडकला आहे. पालिका हा अहवाल राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवणार, राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यावर फेज-२ चे काम सुरु होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 27 Apr 2023
  • 07:23 am
दप्तरदिरंगाईत मेट्रोचा फेज-२ अडकला

दप्तरदिरंगाईत मेट्रोचा फेज-२ अडकला

पहिला टप्पा पूर्ण होत येऊनही दुसरा टप्पा कागदावरच, सविस्तर प्रकल्प अहवालाची फाईल पालिकेच्या बैठकांमध्ये रेंगाळली

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

पुणे शहरातील मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आले असून दुसऱ्या टप्प्यातील काम सुरु होणे अपेक्षित होते. मात्र महामेट्रोने ८२.५ किलोमीटर अंतराच्या मेट्रो फेज-२ चा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सप्टेंबर २०२२ मध्येच पुणे महानगरपालिकेला सादर केला आहे. महापालिकेने हा अहवाल राज्य सरकारला सादर करणे आवश्यक आहे. मात्र, हा अहवाल अजूनही महापालिकेच्या कक्षेतच अडकला आहे. पालिका हा अहवाल राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवणार, राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यावर फेज-२ चे काम सुरु होणार आहे.

पहिल्या फेजमध्ये मेट्रोचे ३३ किलोमीटरचे जाळे विस्तारण्यात आले आहे. त्यातील काही स्थानके सुरू देखील झाली आहेत. पहिला फेजची सर्व कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे फेज-२ च्या विस्ताराबाबत वेगाने हालचाल होणे गरजेचे आहे. महामेट्रोने फेज-२ मधील मार्ग कसा असावा, तेथील स्थानकांची व्यवहार्यता अशा विविध बाबींचा अभ्यास करून डीपीआर तयार केला आहे. महापालिकेला डीपीआर सादर झाल्यानंतर त्यावर दोन-तीन बैठकाही झाल्या आहेत. मात्र, त्यानंतरही या अहवालाची फाईल काही पुढे सरकली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

मेट्रोने फेज-२ साठी घरोघरी जाऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वेक्षण केले आहे. प्रवासी संख्येच्या अंदाजासाठी स्थानिक नागरिकांचे प्राधान्यक्रम समजून घेण्यात आले आहेत. फेज-२ मुळे वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, खडकवासला ते स्वारगेट, एसएनडीटी ते वारजे असे विविध भाग जोडले जाणार आहेत. तर, फेज-१ च्या विस्तारात स्वारगेट आणि कात्रजही जोडले जाणार आहे.  त्याचबरोबर शहरात द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमआरटी) तयार केला जाणार आहे.  त्यामुळे फेज-१ आणि फेज-२ तयार झाल्यानंतर संपूर्ण शहरभर मेट्रोचे जाळे पसरले जाणार आहे. परिणामी पुणे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी अधिक जवळ येणार असून, शहरातील पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर भागातील दळणवळण वेगवान होणार आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प) अतुल गाडगीळ म्हणाले, फेज-२ च्या डीपीआरबाबत पुणे महापालिकेसमोर संपूर्ण सादरीकरण झाले आहे. त्यांनी प्रकल्प अहवालाबाबत काही किरकोळ सुधारणा सुचवल्या होत्या. त्यानुसारही बदल करून त्यांना पाठवला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने डीपीआरवर निर्णय घ्यायला हवा. त्यांनी हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवणे अपेक्षित आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पुणे अर्बन मेट्रो ट्रान्स्पोर्ट अथोरिटीच्या (पीयूएमटीए) बैठकीत डीपीआरवर चर्चा होणार आहे. पुढील आठवड्यात ऑथॉरिटीची बैठक होणे अपेक्षित आहे. त्यानंतर फेज-२ची पुढील दिशा अधिक स्पष्ट होईल.  

पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फेज-२ च्या डीपीआरबाबत बोलण्यास नकार दिला. हा विषय धोरणात्मक असल्याने वरिष्ठांशी संपर्क साधावा, असे सांगत त्यांनी बोलणे टाळले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story