पुत्रप्रेमापोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला
#नागपूर
उद्धव ठाकरे यांचा स्वार्थ आणि पुत्रप्रेमामुळे युती तुटली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले. उद्धव ठाकरे यांनी स्वार्थासाठी हिंदुत्व सोडून भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. आता चूक त्यांच्या लक्षात आली आहे. मात्र, चूक झाल्याचे मान्य करता येत नाही. आडवळणाने चुकल्याचे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे यांना धारेवर धरले.
काँग्रेसच्या विचारधारेची कास धरून भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे हे पाप केवळ स्वार्थ आणि पुत्रप्रेमापोटी झाल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना केवळ सत्तेसाठी त्यांनी तोंडाला पट्टी बांधली होती. यामुळे त्यांना आता हिंदुत्वावर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. निवडणुका या होणारच आहेत ते टाळणे कोणाच्या हाती नाही. २०२४ ला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील महापालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर होणारच आहेत. आम्ही निवडणुकांना घाबरत नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवणार आहोत. उद्धव ठाकरे काही बोलले तर जनता ते मान्य करणार नाही. त्यांना मतदार धडा शिकवतील. निवडणुका केव्हाही झाल्या तरी त्याला तोंड देण्यास आम्ही तयार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर कोणी काही बोलू नये. जो काही निकाल असेल तो मान्य करावा लागेल. उद्धव ठाकरे निकाल आपल्या बाजूने लागल्यासारखे बोलत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला तर शिवसेना त्याचे स्वागत करेल अन्यथा टीका करायला ते सज्ज आहेतच. वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.