पुरोगामी काॅग्रेसला मांजराचे वावडे?
विजय चव्हाण
vijay.chavan@civicmirror.in
TWEET@vijayCmirror
एखाद्या कामास जाताना किंवा बाहेर पडताना जर मांजर आडवे आले तर आपण अशुभ मानतो. अनेकजण तर ते कामही टाळतात किंवा बाहेर जाण्याचे रद्द करतानाचा अनुभव आपणाला येतो. पुरोगामी काँग्रेसमध्येही अशीच धारणा आहे की काय अशी शंका बळावणारी घटना काँग्रेसभवन येथे घडली.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज काँग्रेस भवन येथे बैठक होती. त्यापूर्वी नाना पटोलेंचे बैठकीसाठी काँग्रेस भवन येथे आगमन झाले असता एक मांजर त्यांच्या मार्गामध्ये आडवी जात होती. ही शक्यता ओळखून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची मांजरीला बाजूला करण्याची धडपड पाहण्यास मिळाली आणि त्यांची धडपड यशस्वी देखील झाली.
आज काँग्रेस भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आमदार संग्राम जगताप, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसोबत बैठक झाली. नाना पटोले हे काँग्रेस भवन येथे काही मिनिटांत पोहोचणार अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना मिळाली. त्यानंतर अरविंद शिंदे हे सहकाऱ्यांसह गेटवर जाऊन थांबले. दरम्यान नानांचे आगमन झाले. त्यांचे सर्वांनी स्वागत केल्यावर ते पुढे काही पावले चालत असताना एक मांजर मार्गामध्ये आडवी येत होती. हे ओळखून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची मांजरीला बाजूला करण्याची धडपड पाहावयास मिळाली.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीकरिता भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. निवडणुकीकरिता भाजपकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर हेमंत रासने यांनी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची केसरीवाडा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी शैलेश टिळक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उघड उघड नाराजी देखील व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची रविवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे बैठक झाली होती.
दरम्यान, बैठकीनंतर नाना पटोले म्हणाले की, आजपर्यंत एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यावर ती निवडणूक बिनविरोध होण्याची प्रथा होती. कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती भाजपच्या नेत्याकडून करण्यात आली होती. याबाबत कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली. आपण एकत्रित बसून यावर सविस्तर चर्चा करूया, मात्र माझा फोन होताच पुढील अर्ध्या तासात टिळक कुटुंबीयांऐवजी अन्य उमेदवाराला भाजपकडून संधी देण्यात आली. त्यातून भाजपची नीती दिसून येते. मुक्ता टिळक यांनी आजारी असताना देखील विधिमंडळात येऊन मतदानाचा हक्क बजावला होता. यातून भाजपने कशा प्रकारे टिळक कुटुंबाला न्याय दिला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.