पार्ट टाईम बंदी, फुल्ल टाईम एन्ट्री
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
डंपर, खडी, वाळू, डांबर अथवा अन्य बांधकाम साहित्य शहरातून वाहून नेण्यास जड वाहनांना सकाळी आणि सायंकाळी रहदारीच्या वेळेत बंदी आहे. मात्र, पार्ट टाईम बंदी असली तरी शहरात जड वाहने सर्व वेळेत सर्रास दिसत आहेत. गेल्या चार आठवड्यात तीन महिलांसह एका चिमुरडीचा डंपरखाली आल्याने मृत्यू झाला आहे. यातील तिघाही जणांचा मृत्यू बंदी काळात जड वाहने शहरात वावरत असताना झाला आहे. त्यामुळे यास जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शहरामध्ये जड वाहनांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच जड वाहतुकीवर दिवसा बंदी घालण्यात आली होती. मात्र, संपूर्ण दिवसभर बंदी घातल्यास आम्ही काम केव्हा करायचे अशी मागणी बांधकाम क्षेत्राकडून करण्यात येत होती. त्याचबरोबर रस्ते आणि मेट्रो सारख्या कामांनाही सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंतची बदी परवडणारी नव्हती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सकाळी आठ ते ११ आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत जड वाहनांना बंदी केली. कारण सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी जड वाहने रस्त्यावर आल्यास वाहतूक कोंडीत भर पडण्याचीच शक्यता अधिक. दुसरीकडे अपघाताला निमंत्रण मिळण्याचा धोकाही होता. त्यामुळे गर्दीच्या वेळेत जड वाहतुकीला बंदी आहे. मात्र, या पार्टटाईम बंदीला कोणीच जुमानत नसल्याचे सीविक मिररच्या पाहणीत समोर आले आहे.
दोन अपघातांच्या अनुषंगाने सीविक मिररच्या प्रतिनिधीने पाहणी केली. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मीना गिरीश राठोड (वय ३७, रा येरवडा) यांचा ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास येरवड्यातील गुंजन सिनेमागृहाजवळ गंभीर अपघात झाला होता. गंभीर दुखापतीमुळे गेले चार आठवडे सुरू असलेली त्यांची झुंज २८ फेब्रुवारीला संपली. दुसऱ्या घटनेत बिबवेवाडी जंक्शन येथील चंद्रलोक हॉस्पिटलसमोर १५ फेब्रुवारीला अपघात झाला. त्यात रुपाली कल्पेश बोरा (वय ३८) आणि गरिमा कल्पेश बोरा (वय ८) या मायलेकींचा मृत्यू झाला होता. हा अपघात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सातववाडीमध्ये वडिलांसह शाळेत निघालेल्या चिमुकलीला कंटेनरने चिरडले होते. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. नीलेश तुकाराम साळुंखे (वय ३२) आणि मीनाक्षी नीलेश साळुंखे (वय ७) ही त्यांची नावे. ही घटनाही सकाळच्या वर्दळीच्या वेळेसच घडली होती.
नुकतेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बोरा मायलेकींच्या घरातील सदस्य डॉ. नितीन बोरा यांच्याशी सीविक मिररच्या प्रतिनिधीने संपर्क साधला. डॉ. बोरा म्हणाले, माझ्या वहिनी आणि पुतणीला मी अपघातात गमावले. माझे बिबवेवाडी येथे क्लिनिक आहे. घटनेच्या दिवशी माझ्या भावाने मला बोलावले होते. मला वहिनी आणि पुतणीचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह पाहावा लागला. शहरात सायंकाळी पाच नंतर जड वाहन कसे येते, याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. आपण बनवलेले नियमही आपणच पाळू शकत नाही. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून मी सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पालक संघटना यांच्या भेटी घेणार आहे. याबाबत जागृती करणार आहे. रहदारीच्या वेळी आपली मुलेही व्हॅन अथवा रिक्षामध्ये असतात. त्यांच्यासोबत काही दुर्घटना घडल्यास काय, हा विचारही करवत नाही. त्यामुळे जागृतीसाठी मी प्रयत्न करणार आहे.
गाडीला साईड गार्ड नव्हते...
अपघातस्थळी गेलो तेव्हा संबंधित डंपरला साईड गार्ड नव्हते. एखादा अपघात झाल्यास वाहनाच्या चाकाखाली कोणी येऊ नये म्हणून जड वाहनांना असे गार्ड लावले जाते. त्यामुळे जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. असे गार्ड या वाहनाला नव्हते अशी माहितीही डॉ. नितीन बोरा यांनी दिली.
बिबवेवाडी येथे मायलेकींना आणि येरवड्यात एका युवतीला डंपरने चिरडल्याची घटना घडली होती. डंपर सारख्या जड वाहनांमध्ये डंपर क्लीनरही असणे आवश्यक असते. मात्र, बहुतांश गाड्यांमध्ये तो नसतो. शिवाय अशी वाहने रहदारीच्या वेळेत रस्त्यावर येताच कामा नये. मात्र, बंधने झुगारून ही वाहने रस्त्यावर येतात. रहदारीच्या वेळेत जड वाहनांवर पूर्णतः बंदी घालावी आणि त्यांच्यावर वेगाचेही बंधन असावे, अशी मागणी पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त वाहतूक यांच्याकडे केली असल्याची माहिती महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया यांनी दिली.
स्वारगेट येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गांधी म्हणाले की, गर्दीच्या वेळी शहरात जड वाहने येताच कामा नये. त्यानंतरही ही वाहने सर्रास रस्त्यावर दिसतात. अशा वाहनांवर पोलीस का कारवाई करीत नाहीत. तीन जणांचा नुकताच मृत्यू झाला आहे. आता आणखी किती मृत्यू होण्याची आपण वाट पाहणार आहोत?
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.