प्रवाशांना सेवा तीच, पण दर महाग !
राजानंद मोरे
rajanand.more@civicmirror.in
प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात न्हाऊन निघणाऱ्या वंदे भारतच्या दोन रेल्वेंना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला. मुंबईतून सोलापूर आणि साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डी या मागार्वर धावणाऱ्या गाड्यांना सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी गाडीचे जल्लोशात स्वागत केले. अशा प्रसिद्धीमाध्यमांतून जोरात धावणाऱ्या वंदे भारतमुळे प्रवासी मात्र कोमात गेले आहेत. गेल्या तीन दिवसांतील तिकीटविक्रीवर नजर टाकली तर वंदे भारतबाबतचा प्रवाशांचा उत्साह मावळल्याचे दिसते. अन्य गाड्यांच्या तुलनेत वंदे भारतचे दर अव्वाच्या सव्वा असल्याने प्रवाशांनी गाडीकडे पाठ फिरवली असून तीन दिवसांत तिकीट विक्री ६० टक्क्यांवर आली आहे.
नव्या गाडीतील सुविधांमुळे प्रारंभी प्रवाशांचा उत्साह असतो. मात्र, तो किती टिकून राहतो हे पाहावे लागते. पुढील आठवड्यातील तिकीट विक्रीतून प्रत्यक्ष गाडीला कसा प्रतिसाद मिळतो ते समोर येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. भरमसाठ दरामुळे गेल्या तीन दिवसांत मुंबई -सोलापूर वंदे भारतची केवळ ६० ते ६५ टक्केच तिकीट विक्री झाली आहे. भरमसाठ दरामुळे वंदे भारत गाडीला अल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांसह प्रवाशांकडूनही व्यक्त केली जात आहे.
भरमसाठ दर
वंदे भारत एक्स्प्रेस ताशी १६० वेगाने धावत असल्याने मुंबई ते पुणे आणि मुंबई ते सोलापूरदरम्यानचा प्रवासाचा कालावधी कमी होईल, असा दावा रेल्वेकडून केला जात आहे. तसेच आरामदायी प्रवासामुळे प्रवास अत्यंत सुखकर होणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात प्रवास सुखकर होणार असला तरी इतर गाड्यांमधील वेळा आणि वंदे भारतला लागणार वेळ यात फार फरक नसल्याचे दिसून येते. दुसऱ्या बाजूला तिकीट दरामध्ये मात्र खूपच अंतर असल्याने ही बाब प्रवाशांना चांगलीच खटकणारी आहे. केवळ, सुविधांसाठी एवढा फरक का सोसायचा, हा त्यांचा प्रश्न आहे.
वंदे भारत गाडीची प्रवासी क्षमता १ हजार १२८ एवढी आहे. पण मुंबई ते सोलापूरदरम्यान तिन्ही दिवस केवळ ६० ते ६५ टक्केच प्रवासी गाडीत होते. अकरा तारखेला ६७८ प्रवाशांनी मुंबईतून सोलापूरकडे तर ७५७ प्रवाशांनी सोलापूरहून मुंबईकडे प्रवास केला. त्यामध्ये अनुक्रमे मुंबई ते पुण्यादरम्यान ११५ आणि पुण्यातून मुंबईदरम्यान ४१० प्रवाशांनी वंदे भारतमधून प्रवासाला पसंती दिली.
वंदे भारतबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. त्यासाठीच अनेक प्रवासी सध्या या गाडीने प्रवास करत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यापासून प्रत्यक्षात नेमका किती प्रतिसाद मिळेल, याचा अंदाज बांधता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे व मुंबई ही दोन्ही महानगरे असून उद्योगधंदे, शैक्षणिक, आरोग्य सुविधा खूप आहेत. त्या तुलनेत सोलापूरचा विकास तेवढा झालेला नाही. त्यामुळे तेथून वंदे भारतने खर्चिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे.
वेळ अडचणीची याविषयी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, वंदे भारत व इतर गाड्यांच्या तिकीट दरामध्ये खूप तफावत आहे. डेक्कन क्वीन व वंदे भारतमधील सुविधांमध्येही फारसा फरक नाही. पुणे किंवा मुंबईतून गाडीच्या वेळाही सोईस्कर नाहीत.
पुण्यातून ही गाडी ९.२० वाजता सुटते. ती साडेबारा वाजता पोहचते. कार्यालयीन कामकाजासह इतर कामांसाठीही धावपळ करून जाण्याासाठी गाडी सोयीची नाही. गाडीचा प्रतिसाद वाढविण्यासाठी वेळा बदलण्यासह द्वितीय श्रेणीचे डबेही हवे होते. पुढे या गाडीचे शंभर टक्के आरक्षण होणार नाही. याबाबत रेल्वेकडून विचार होण्याची गरज आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.