प्रवाशांची कधी नव्हे ती होणार उठ'बस'

प्रवाशांशी नेहमीच गैरवर्तन करणारे, थांब्यावर अनपेक्षित ठिकाणी बस थांबवणारे आणि असंख्य प्रकारे प्रवाशांचा वैताग वाढवणारे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) कर्मचारी यापुढे प्रवाशांशी विनम्रतेने वागायला लागले तर सर्वांनाच आश्चर्य वाटेल, पण ही शक्यता आता सत्यात उतरणार आहे. प्रजासत्ताकदिनानंतर प्रवाशांना ३० मार्गांवर आदर्शवत सेवा मिळणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Editor User
  • Fri, 27 Jan 2023
  • 02:51 pm

प्रवाशांची कधी नव्हे ती होणार उठ'बस'

पीएमपीची ३० मार्गांवर आदर्शवत सेवा; नेहमीच्या तक्रारींचे होणार निवारण, प्रवाशांसोबत कर्मचारी करणार सौजन्यशील वर्तन

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

 

प्रवाशांशी नेहमीच गैरवर्तन करणारे, थांब्यावर अनपेक्षित ठिकाणी बस थांबवणारे आणि असंख्य प्रकारे प्रवाशांचा वैताग वाढवणारे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) कर्मचारी यापुढे प्रवाशांशी विनम्रतेने वागायला लागले तर सर्वांनाच आश्चर्य वाटेल, पण ही शक्यता आता सत्यात उतरणार आहे. प्रजासत्ताकदिनानंतर प्रवाशांना ३० मार्गांवर आदर्शवत सेवा मिळणार आहे.

पीएमपी बससेवेबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात. ब्रेकडाऊन, बसमध्ये गर्दी, चालक-वाहकांचे गैरवर्तन, बस येण्यास विलंब असा तक्रारींचा रोजच पाऊस पडत असतो. या तक्रारींचे निवारण करतानाही प्रशासनाचा प्रवाशांप्रती असणारा दृष्टिकोन अजबच असतो. मात्र हे सगळे नकारात्मक चित्र आता बदलणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या संकल्पनेतून आदर्शवत संचलनाचा उपक्रम पुढे आला आहे. जनमानसातील पीएमपीची प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्यापैकीच हा एक उपक्रम आहे. प्रशासनाने प्रत्येक आगारातील तीस मार्ग निवडले असून त्यावर बारकाईने लक्ष राहणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर या मार्गांची निवड करण्यात आली आहे. पीएमपीच्या दररोज जवळपास ३० हून अधिक बस बंद पडतात. ३०० ते ४०० बस विविध कारणांमुळे मार्गावर येत नाहीत. पंधरा आगारांमध्ये जवळपास १७०० बस रोज मार्गावर असतात, तर प्रवासी संख्या ११ ते १२ लाख एवढी आहे. अनेक मार्गांवर बसची संख्या आणि प्रवासी संख्येत मोठी तफावत असल्याने गर्दी होते. बस बंद पडल्याने प्रवाशांना तासन् तास ताटकळत उभे राहावे लागते. चालक-वाहक व प्रवाशांमध्ये तर अनेकदा वाद होतात. बस थांब्याजवळ न थांबविण्याच्या प्रकाराबाबतही सातत्याने तक्रारी असतात.

विविध कारणांमुळे पीएमपीचा तोटा वाढत चालला असून ही तूट कमी करण्यासाठी बकोरिया यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रवासी संख्या वाढविण्यावरही भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर प्रवास घडावा, यासाठी कधी नव्हे ते आता जोमाने प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. येत्या २७ जानेवारीपासून पंधरा आगारांतील प्रत्येकी दोन मार्गांवर आदर्शवत बससेवा देण्याचा पीएमपी प्रशासनाचा प्रयत्न आहे. हे मार्ग आगार प्रमुखांनाच निवडण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून प्रामुख्याने जादा उत्पन्न मिळवून देणारे मार्ग निवडण्यात आल्याचे दिसते. याबाबत प्रशासनाने सर्व आगारप्रमुखांना सूचना दिल्या आहेत.

तीस आदर्शवत मार्गांवरील पीएमपीची एकही फेरी रद्द होणार नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक बस वेळेत मार्गस्थ करण्याचाही काटेकोर प्रयत्न केला जाणार आहे. तशी ताकीद प्रत्येक चालक व वाहकाला देण्यात आली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते पीएमपी बसच्या कर्मचाऱ्यांकडून नियमांचे पालन केले जाणार आहे. संबंधित बसवर चालक व वाहक बदलले जाणार नाहीत. ते दोघे जणू त्या बसचे पालकच असतील. त्या दोघांनी प्रवाशांशी सौजन्यपूर्ण व नम्रतापूर्वक वर्तवणूक करण्याबाबत खबरदारी घ्यायची आहे. दोघांचा गणवेश स्वच्छ असेल. बस आतून व बाहेरून स्वच्छ करूनच मार्गावर दिली जाईल. आगार व्यवस्थापकांचे या मार्गांवर विशेष लक्ष राहणार असून प्राधान्याने अडचणी सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विषयी 'सीविक मिरर'शी बोलताना बकोरिया म्हणाले, प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, पण प्रत्येक आगारानुसार निवडण्यात आलेल्या मार्गांवर आगार व्यवस्थापकांना प्राधान्याने विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. या मार्गांवर बसफेऱ्या रद्द होणार नाही, बस वेळेतच सुटतील याबाबत दक्षता घेतली जाईल. प्रामुख्याने वाहतूक कोंडीमुळे बसला विलंब होतो. या बाबी विचारात घेऊन बसच्या वेळा पाळण्याचा प्रयत्न असेल. बसमधील स्वच्छता, चालक व वाहकांच्या वर्तनावरही लक्ष राहणार आहे. या कालावधीत या मार्गांवर प्रवाशांना येणारा अनुभव, त्यांना मिळणारी सेवा या बाबींचा विचार करून भविष्यात इतर मार्गांवरही अशीच सेवा देण्याचा प्रयत्न राहील, असे बकोरिया यांनी स्पष्ट केले.

 

या मार्गांवर बसणार 

प्रवाशांना सुखद धक्के

१) आनंदनगर/सनसिटी ते महात्मा फुले मंडई

२) स्वारगेट ते सिंहगड पायथा

३) मनपा भवन ते आळंदी दर्शन

४) मनपा भवन ते वडगाव शेरी

५) वारजे माळवाडी ते निगडी

६) वारजे माळवाडी ते भोसरी

७) नऱ्हेगाव ते स्वारगेट

८) जांभूळवाडी ते स्वारगेट

९) हडपसर ते भक्ती-शक्ती

१०) हडपसर ते कात्रज

११) सुखसाखर ते एनडीए गेट नं. १०

१२) अप्पर डेपो ते स्वारगेट

१३) पुणे स्टेशन ते खराडी (ढोले पाटील कॉलेज)

१४) पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द

१५) निगडी ते देहूगाव

१६) मनपा भवन ते किवळे

१७) भोसरी ते कात्रज

१८) भोसरी ते हिंजवडी माण फेज ३

१९) चिंचवडगाव ते भोसरी

२०) डांगे चौक ते चिखली

२१) भेकराईनगर ते कात्रज

२२) भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज- ३

२३) शेवाळवाडी ते कात्रज

२४) शेवाळवाडी ते कोथरूड डेपो

२५) म्हाळुंगे गाव ते आळंदी दर्शन

२६) चिंचवड गाव ते चांदखेड

२७) मनपा भवन ते म्हाळुंगे गाव

२८) कात्रज ते हिंजवडी माण फेज ३

२९) वारजे माळवाडी ते वाघोली

३०) वाघोली ते निगडी

 

एकूण आगार ः १५

एकूण आदर्शवत मार्ग ः ३०

आदर्शवत मार्गांवरील खेपा ः ३ हजार २८९

या मार्गांवरील नोव्हेंबर महिन्याचे उत्पन्न – ८ कोटी ४१ लाख ६६ हजार ८६७

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story