private detective arrested
गौरव कदम
gaurav.kadam@civicmirror.in
TWEET@Gaurav_Mirror
महिलेचा पाठलाग करून तिचे लपून छायाचित्र काढणे एका गुप्तचर संस्थेतील कर्मचाऱ्यांना अंगलट आले. महिलेने पाठलाग होत असल्याची तक्रार पुणे पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षात दिल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी पाळत ठेवून दोघांना पकडले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलेश लक्ष्मणसिंग परदेशी (वय २५, रा. वडगाव मावळ), राहुल गुणवंतराव बिरादार (वय ३०, रा. देहूगाव, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नीलेश परदेशी याची खासगी गुप्तचर संस्था असून राहुल बिरादार हा त्याचा सहायक आहे. याबाबत कोरेगाव पार्क भागातील एका ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा गेल्या महिन्यात १ डिसेंबरपासून पाठलाग सुरू होता. आपला कोणीतरी पाठलाग करते, याचा संशय महिलेला होता. महिलेचे छायाचित्र काढून कोणाला तरी पाठविण्यात आल्याचा संशय महिलेला होता. समाजमाध्यमावर आपले छायाचित्र प्रसारित करून गैरवापर होण्याची भीती महिलेला वाटत होती. त्यामुळे महिलेने पुणे पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षात तक्रार दिली होती. महिलेने गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांची भेट घेतली होती.
त्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी पाळत ठेवणाऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी महिला कोरेगाव पार्क भागातील एका हाॅटेलमध्ये गेली होती. त्या वेळी परदेशी आणि बिरादार महिलेवर पाळत ठेवून थांबले होते. दोघेजण तिचे लांबून छायाचित्र काढत होते. साध्या वेशातील पोलिसांनी दोघांच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. परदेशी आणि बिरादार यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघेजण एका गुप्तचर संस्थेसाठी काम करत असल्याचे उघड झाले. महिलेचा पाठलाग करून तिची माहिती काढण्याचे काम कोणी दिले, याची माहिती दोघांनी पोलिसांना दिली नसून सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.