पीएमपीला वाहतूक नियमांचे वावडे
बीआरटी मार्गातून जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या बस चालकाने सिग्नल मोडल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज लहानसहान अपघात घडत आहेत. या बस चालकांवर कारवाई होत असते, असे ठामपणे सांगणाऱ्या पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे किती बस चालकांना दंड ठोठावला याची माहिती उपलब्ध नाही, हे विशेष!
दापोडी ते निगडी, औंध-रावेत, वाकड ते नाशिक फाटा या तीन मार्गांवर बीआरटी बस सेवा सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उजव्या बाजूला पीएमपीच्या बसकरिता एक मार्गिका राखीव ठेवण्यात आली आहे. दापोडी ते निगडी या भागात ग्रेडसेपरेटरमुळे सेवा रस्त्यावर येण्यासाठी आणि ग्रेडसेपरेटरमध्ये प्रवेश करण्यासाठी इन आउट मर्ज आहेत. या ठिकाणी वॉर्डन असणे आवश्यक असताना एखाद-दुसऱ्या ठिकाणाचा अपवाद वगळता सध्या वॉर्डन दिसून येत नाहीत.
या सर्वाचा परिणाम म्हणून ग्रेडसेपरेटरमधून बाहेर येणाऱ्या आणि आत जाणाऱ्या वाहनांचे बीआरटीमधून वेगात जाणाऱ्या बससोबत अपघात होत आहेत. त्याचबरोबर चौकात आल्यावर पीएमपीच्या बससाठी आणि अन्य वाहनांसाठी स्वतंत्र सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्य सिग्नल सुटण्यापूर्वी १५ सेकंद आधी बसला सरळ जाण्यासाठी स्वतंत्र सिग्नल आहे, पण मुख्य सिग्नल सुटल्यावर पीएमपीच्या बस पुढे जातात. यामुळे ज्या वाहनांना उजवीकडे वळायचे असते ती वाहने बससमोर येऊन थांबतात. यातून दररोज अपघात घडत आहेत.
अनेकदा बसचा वेग जास्त असल्याने प्राणांतिक अपघाताचा धोका पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही बीआरटी मार्गांवर निर्माण झाला आहे. बीआरटी योजना राबविताना बस स्थानके, ग्रेडसेपरेटर आणि वेळप्रसंगी सिग्नलसाठी वॉर्डन दिले जातील, असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, आता बसस्थानके सोडली तर वॉर्डन कुठेच दिसत नाही.
सर्व मुख्य चौकात जे वॉर्डन नेमण्यात आले आहेत, ते वाहतूक पोलिसांना वाहने पकडून देण्याचे काम करताना दिसून येतात. अशाप्रकारे वाहतूक नियमन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या वॉर्डनचे भलतेच उद्योग शहरात सुरू असल्याचे दिसून येते. सिग्नल मोडणे, पांढऱ्या पट्ट्यापुढे (झेब्रा क्रॉसिंग) वाहने थांबवणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी आणि कार चालकांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाते. परंतु, पीएमपीच्या बस चालकांनी नियमांचे उल्लंघन केले म्हणून कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.
शहरातील सर्वच प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात स्मार्टसिटीचे स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पण यातील बहुतांश कॅमेरे अद्याप सुरू झालेले नाहीत. जे कॅमेरे सुरू आहेत, त्यावरून ऑटोमॅटिक दंडाची पावती पाठविणे अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे एक अधिकारी आणि पाच पोलीस कर्मचारी स्मार्टसिटीच्या कंट्रोल रूममध्ये नियुक्त करण्यात आले असून, हे पोलीस सीसीटीव्हीत लाईव्ह दिसणाऱ्या वाहनांचे नोंदणी क्रमांक लिहून त्यावर कालांतराने कारवाई करतात. परंतु, या पोलिसांकडूनही आतापर्यंत पीएमपी बसवर कारवाई झालेली नाही.
सरकारी वाहने असल्याने बहुदा त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात नसावी. माझे ड्रायव्हिंग लायसन्स घरी राहिले, म्हणून मला दंड भरावा लागला. पण मुख्य चौकात पोलिसांसमोर वाहतुकीचे नियमभंग करून सिग्नल मोडणाऱ्या बस चालकांवर कारवाई होत नाही. नियम सगळ्यांना सारखे ठेवल्यास चौकाचौकात बसमुळे घडणारे अपघात कमी होतील, अशी प्रतिक्रिया कॉलेज विद्यार्थी असलेल्या अशितोष गुळींग याने ‘सीविक मिरर’शी बोलताना दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.