BRT Stop
राजानंद मोरे
rajanand.more@civicmirror.in
TWEET@rajanandmirror
पुणे महानगर परिवहन महामंडळाने खर्च कमी करण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिट मार्गावरील सुमारे शंभरावरील बसस्थानकांमधील सुरक्षारक्षक कमी केले. हेच सुरक्षारक्षक स्थानकांमधील दिवे चालू-बंद करायचे. मात्र, ते गेल्यानंतर आता दिवे चालू-बंद करण्यासाठी पीएमपीवर दररोज १० ते १२ कर्मचारी पाठवण्याची वेळ आली आहे.
पीएमपीएमएलकडून तोटा कमी करण्यासाठी विविध गोष्टींवरील खर्च कमी केला जात आहे. त्यानुसार बीआरटी मार्गावरील सुमारे ११५ बसस्थानकांच्या सुरक्षेसाठी नेमलेले सुरक्षारक्षक कमी केले, पण यामुळे पीएमपीसमोर वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानकांमध्ये हेच सुरक्षारक्षक रात्रीच्या वेळी दिवे सुरू करणे आणि सकाळी बंद करण्याचे काम करत होते. आता दिवे चालू-बंद करण्यासाठी पीएमपीला दररोज १० ते १२ कर्मचारी पाठवावे लागत आहेत. पण हे काम वेळेत होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून वीजबील वाढल्याचा दावादेखील पीएमपी अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
पुणे महापालिकेच्या हद्दीत संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते आपले घर आणि स्वारगेट ते कात्रज हे तीन बीआरटी मार्ग तर पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी ते दापोडी, सांगवी फाटा ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड चौक, काळेवाडी फाटा ते चिखली या मार्गांवर बसचे संचलन सुरू आहे. बीआरटी मार्गांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकांकडे आहे. या मार्गांवर सुमारे ११५ बसथांबे आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांचे वेतन पीएमपीकडूनच दिले जात होते. त्यासाठी दरमहा वीस ते तीस लाख रुपये खर्च येत होता. सध्या पीएमपीची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. तुटीचा बोजा वर्षागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी प्रशासनाने सुरक्षारक्षकांना घरी बसविले. त्यांच्याकडून बसस्थानकांच्या सुरक्षेसह देखभालीकडेही लक्ष दिले जात होते. स्थानकातील दिवे चालू-बंद करण्याचे काम तेच करत होते.
आता सुरक्षारक्षक नसल्याने पाच ते सहा आगारांतील दररोज किमान दोन कर्मचारी केवळ दिवे चालू आणि बंद करण्यासाठी पीएमपीला पुरवावे लागत आहेत. सकाळी साधारणपणे सहा वाजता दिवे बंद करणे आणि सायंकाळी सातच्या सुमारास ते चालू करण्याचे काम हे कर्मचारी करतात. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याचे तीन ते चार तास याच कामात जातात. हे एक प्रकारे पीएमपीचे नुकसानच आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना रोजचे तीन ते चार तास केवळ दिवे बंद करण्यासाठी वेतन दिले जात असल्याचे प्रकार घडत आहे.
दुसरीकडे दिवे वेळेवर बंद होत नसल्याने पीएमपीचे वीजबिल वाढत चालले आहे. पूर्वीच्या तुलनेत यामध्ये २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे दिसते. बहुतेक बसथांब्याचे महिन्याचे वीजबिल पंधराशे ते अठराशे रुपये आहे. सांगवी फाटा स्थानकात डिसेंबरमध्ये केवळ ८९ युनिट वीज खर्ची पडले, तर जानेवारीमध्ये हा आकडा १२४ युनिटवर पोहचला. कात्रज मार्गावरील पंचमी बसस्थानकातही या दोन महिन्यांतील विजेचा वापर अनुक्रमे १२७ आणि १७५ युनिट एवढा होता. त्यामुळे पीएमपीच्या वीजबिलाचा खर्च वाढला आहे.
पीएमपी प्रशासनाच्या हे लक्षात आल्यानंतर आता सर्व ११५ बसस्थानकांमध्ये दिव्यांसाठी ऑटोमेटिक टायमर बसविण्याची मागणी त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली आहे. मनुष्यबळाच्या अभावामुळे बसस्थानकातील दिवे वेळेत चालू-बंद होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच पीएमपीचे वीजबिल वाढल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे सर्व बीआरटी बसस्थानकांमध्ये ऑटोमेटिक टायमर बसविण्याची मागणी प्रशासनाने केली आहे. या संदर्भात पत्र दोन्ही महापालिकांना देण्यात आले आहे.