पदरवाडी डोंगर कड्याला ३०० मीटरपर्यंत भेगा

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीची घटना ताजी असतानाच आता भीमाशंकर परिसरात तशीची काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भीमाशंकरच्या डोंगर कड्यावरील पदरवाडी येथील डोंगराला भेगा पडल्या असल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Sat, 5 Aug 2023
  • 12:39 pm
पदरवाडी डोंगर कड्याला ३०० मीटरपर्यंत भेगा

पदरवाडी डोंगर कड्याला ३०० मीटरपर्यंत भेगा

गावातील १५ कुटुंबातील ८० जणांचा जीव लागला टांगणीला, प्रशासनाने केली तातडीने पाहणी

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीची  घटना ताजी असतानाच आता भीमाशंकर परिसरात तशीची काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भीमाशंकरच्या डोंगर कड्यावरील पदरवाडी येथील डोंगराला भेगा पडल्या असल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

माहिती मिळताच अप्पर तहसीलदार नेहा शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगर कड्याला ३०० मीटरपर्यंत भेगा पडल्या आहेत. यामुळे  पदरवाडी गावच्या १५ कुटुंबातील ८० जणांचा जीव टांगणीला लागला असून १०० हून आधिक जनावरांचे आयुष्य धोक्यात आले आहे.

पदरवाडी परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे डोंगर कडा कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पदरवाडीचे तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी आता केली जात आहे.

ऑगस्ट रोजी स्थानिक ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या पडलेल्या भेगांचे फोटो सोशल मीडियावर व स्थानिक प्रशासनाला पाठवल्याने या वाडीतील लोकांना वाटणारी भिती  सर्वासमोर आली आहे. यानंतर प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांशी संवाद साधला. सध्याही या भागात पाऊस सुरू असून, या वाडीतील नागरिकांचे पूनर्वसन करण्याची गरज आहे.

आंबेगाव तालुक्यात माळीण येथे २०१४मध्ये दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती. त्यामध्ये १५१ जणांचा मृत्यू झाला होता. या गावाचे पुनर्वसन करून नव्याने पुन्हा गाव उभे करण्यात आले आहे. माळीणच्या दुर्घटनेनंतर या गावांप्रमाणे जिल्ह्यातील धोकादायक गावांची पाहणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार माळीणच्या घटनेनंतर जिल्ह्यातील १४०० गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालनालय; तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांच्यामार्फत दोनदा; तर सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांमार्फत (सीओईपी) एकदा करण्यात आले. त्याचा अहवालही जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.

संबंधित गावांमध्ये डोंगर उतारावर चर काढणे, धोकादायक डोंगरकडे तोडणे किंवा डोंगरकड्यास स्थिर करणे, बांबूच्या झाडांची लागवड करणे अशी आवश्यक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे करण्यात येत आहेत. या गावांमध्ये संरक्षक भिंत उभारणे, गावामध्ये पावसाचे पाणी येण्याची भीती असल्याने ते पाणी बाहेर काढून घेण्यासाठी बांध घालणे यासारख्या कामांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे डोंगर कोसळल्यास गावावर कोणतीही आपत्ती कोसळू नये, यासाठी बांबूच्या झाडांची लागवड करणे सुरू आहे. डोंगरावरून पावसामुळे वाहून येणारी माती बांबूच्या झाडांमध्ये अडकू शकते; तसेच ज्या गावांजवळील असलेल्या डोंगरकडा कोसळण्याची शक्यता असल्यास तो तोडणे किंवा संबंधित डोंगरकड्यास स्थिर करणे अशी कामे प्रगतिपथावर आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story