पाचटाने झोपड्या केल्या भस्मसात
#पारगाव
पारगाव (ता. आंबेगाव) येथील चिचगाईमळा रस्त्यावर असलेल्या ऊसतोडी मजुरांच्या झोपड्यांना लागलेल्या आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत ऊसतोडणी मजुरांच्या संसारोपयोगी वस्तू धान्य, कपडे, जळून खाक झाले. एकूण सुमारे एक लाख रुपयांंचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
येथील भीमाशंकर साखर कारखाना लगत चिचगाईमळा रस्त्यावर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार, भीमाशंकर साखर कारखान्याच्या बाजूला चिचगाई वस्तीजवळ आनशाबा खंडू चितळकर, अर्जुन नवनाथ क्षीरसागर तसेच किसन आनशाबा चितळकर (मूळ रा. पाथर्डी ) या ऊसतोड मजुरांच्या उसाच्या पाचटापासून तयार केलेल्या झोपड्या आहेत. सकाळी ऊसतोडणी मजूर ऊसतोडण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी एकच्या सुमारास या तीन झोपड्यांना आग लागली. उसाच्या पाचटामुळे आगीने उग्ररूप धारण केल्यामुळे तीनही झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत आनशाबा चितळकर यांचे सहा पोती धान्य, कपडे, टीव्ही, संसारोपयोगी वस्तू, जनावरांचे खाद्य जळून खाक झाले. त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच अर्जुन क्षीरसागर यांचे धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यात त्यांचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. किसन चितळकर यांचे धान्य, कपडे, वस्तू जळून जाऊन ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. भीमाशंकर साखर कारखान्याने आग विझवण्यासाठी पाण्याचा टँकर पाठवल्याने आग नियंत्रणात आली. त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.