पालिकेवर दिवसाढवळ्या दरोडा
तन्मय ठोंबरे / राजानंद मोरे
tanmay.thombre@civicmirror.in/rajanand.more@civicmirror.in
TWEET @tanmaytmirror/@Rajanandmirror
पुणे महापालिकेच्या कामकाजाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. मध्यवर्ती भांडार विभागाच्या नायडू रुग्णालयाजवळील डेपोसमोरून विजेच्या खांबांवर डल्ला मारला जात आहे. हे खांब दिवसाढवळ्या करवतीने कापून भंगाराच्या दुकानात विक्री करून पैसे कमावले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत भंगार विभागासह विद्युत विभागही अनभिज्ञ आहे.
‘सीविक मिरर’ प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर या प्रकाराची पोलखोल झाली. मध्यवर्ती भांडार विभागाचा डेपो नायडू रुग्णालयाजवळ आहे. या डेपोमध्ये स्टेशनरी, विद्युत तसेच इतर विभागांचे विविध साहित्य असते. अनेक विभागांना आवश्यकतेनुसार लागणाऱ्या वस्तू निविदा प्रक्रिया राबवून भांडार विभागाकडून पुरविल्या जातात. तसेच जुन्या, खराब झालेल्या सामानाचा लिलाव केला जातो, पण डेपोच्या बाहेर रस्त्यालगत पडलेल्या सामानाची जबाबदारी भांडार विभागाकडे नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डेपोसमोरच्या रस्त्यावर शेकडो जुने विद्युत खांब, जी-२० परिषदेच्या बैठकीवेळी रंगरंगोटी केलेले जवळपास वीसहून अधिक खांब, हजारो किलोच्या वायर, पाईप तसेच इतर भंगारातील सामान उघड्यावर टाकण्यात आले आहे.
लाखो रुपयांच्या या साहित्यावर देखरेख ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक किंवा इतर कसलीही यंत्रणा नसल्याचे आढळून आले आहे. रविवारी सुटी असल्याने भांडार विभागाचा डेपो बंद असतो. याचा फायदा घेत काहीजणांकडून विद्युत विभागाचे खांब भंगारात विकले जात असल्याचे समोर आले आहे. यातील खांब पालिकेत समाविष्ट गावांमध्ये उभे करण्याचे नियोजन आहे. पण त्याआधीच खांबांची चोरी सुरू झाली आहे. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास ‘सीविक मिरर’च्या प्रतिनिधीला दोन महिला विजेचे खांब करवतीने कापत असल्याचे आढळून आले. हे जुने खांब असून त्याच्या विक्रीतून पैसे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
काही वेळाने पुन्हा त्याच ठिकाणी गेल्यानंतर सात-आठ महिला हेच काम करत होत्या. लोखंडी खांबाचे तुकडे करून त्याचा ढीग लावण्यात आला होता. त्यानंतर काही वेळाने एक दुचाकीस्वार तिथे आला आणि त्याने पोत्यात भरलेल्या खांबांचे तुकडे नेले. तो थेट मंगळवार पेठेतील सिंचन भवनजवळच्या भंगाराच्या दुकानात गेला. सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन महिला खांब कापण्याचे काम करत होत्या. त्यावेळी एक रिक्षा तिथे येथे. जवळपास १५ फुटांचा खांब उचलून थेट रिक्षाच्या छतावर बांधण्यात येतो. एक महिला एका बाजूला खांबाला बांधलेले कापड धरून रिक्षात बसते. तर एक चार-पाच फुटांचा तुकडा घेऊन दोन महिला दुचाकीवरून निघून जातात.
दोन्ही वाहने परिसरातून निघतात. ‘सीविक मिरर’चे प्रतिनिधी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करतात. अत्यंत धोकादायक पद्धतीने रिक्षावर खांब नेला जात होता. खड्डा किंवा गतिरोधक आल्यानंतर खांब जोरजोरात हेलकावत होता. त्यामुळे इतर वाहनांनाही धोका निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वाहनांची गर्दी असूनही संबंधित रिक्षाचालकाला त्याचे काहीच देणेघेणे नव्हते. पुढे ही रिक्षा आणि दुचाकीवरील महिला शाहीर अमर शेख चौकातून (जुना बाजार) मंगळवार पेठेतून थेट सिंचन भवनजवळील एका भंगार दुकानासमोर थांबतात. तिथे मोठा खांब तसेच तुकड्यांचे वजन करून विक्री केली जाते. प्रत्येक रविवारी असाच धक्कादायक प्रकार घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरुवातीला या महिलांशी बोलताना त्यांनी याबाबत संकेत दिले होते. त्यामुळे पालिकेचे किती साहित्य असे भंगारात गेले असावे, याबाबत आता अधिकारीच सांगू शकतील.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.