पालिका अधिकारी घेतात रोहिंग्यांकडून पैसे
सीविक मिरर ब्यूरो
शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्याने शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्या विषयी समाजमाध्यमावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शहर अभियंता प्रशांत वाघमारे (वय ५४) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी लिगल राईट ऑबर्झव्हेटरी (एलआरओ) या समाजमाध्यमातील खातेधारक तसेच वापरकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘‘महापालिकेकडून शहरातील बेकायदा बांधकामांविरुद्ध कारवाई करण्यात आली. महापालिकेत बेकायदा कृत्य करणारी टोळी आहे. या टोळीचे नेतृत्व प्रशांत वाघमारे, माधव जगताप करतात. रोहिंगे फेरीवाल्यांकडून पैसे घेऊन ते कारवाई करतात. त्यांची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी), प्राप्तिकर विभागाकडे करणार आहे,’’ असा मजकूर समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आला.
याबाबतची माहिती वाघमारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भारतीय दंड संहितेचं कलम ४९९ मध्ये डीफेमेशन किंवा अब्रुनुकसानीची व्याख्या दिलेली आहे. बोलण्यातून, लिहिण्यातून किंवा कोणत्याही प्रकारच्या दृश्य प्रदर्शनातून एखाद्या व्यक्तीच्या लौकिकाला बाधा पोहोचत असेल किंवा ती होतेय असे त्या व्यक्तीला वाटण्याचे कारण असेल तर त्याला अब्रुनुकसानी किंवा मानहानी म्हटले जाते.
अब्रुनुकसानीची केस दिवाणी असू शकते किंवा फौजदारीही असू शकते. दिवाणी खटल्यात नुकसानभरपाईदाखल दंड येतो आणि फौजदारी खटल्यात दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
इथे मात्र सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि जनतेचे सेवक या सदरात मोडणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्या सार्वजनिक कामांसंदर्भात त्यांच्या भूमिकेबद्दल सद्हेतूने म्हटलेल्या गोष्टी अब्रुनुकसानी ठरत नाहीत, पण त्यापलीकडे जाऊन केलेल्या टीका-टिप्पणी असल्याने यात संरक्षण नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.