ऑक्सिजन पार्क बनणार ‘ऑक्सिजन’ संपवून

वाढत्या नागरिकरणाने प्रदूषणाचा प्रश्न उग्र बनत आहे. त्यावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी ‘ऑक्सिजन पार्क’ ची कल्पना राबवली जाते. खराडी-वडगाव शेरी परिसरातही अशाचप्रकारे ‘ऑक्सिजन पार्क’ होणार आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे हवेतील प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन वाढावा यासाठी उभारण्यात येणाऱ्या या पार्कच्या उभारणीत प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचा मुख्यस्रोत असलेल्या वृक्षांवरच कुऱ्हाड पडणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 27 Mar 2023
  • 11:12 am
ऑक्सिजन पार्क बनणार ‘ऑक्सिजन’ संपवून

ऑक्सिजन पार्क बनणार ‘ऑक्सिजन’ संपवून

खराडी-वडगाव शेरीत प्राणवायू देणाऱ्या ५९ झाडांची कत्तल करण्याचा उद्यान विभागाकडे प्रस्ताव

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

वाढत्या नागरिकरणाने प्रदूषणाचा प्रश्न उग्र बनत आहे. त्यावर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी ‘ऑक्सिजन पार्क’ ची कल्पना राबवली जाते. खराडी-वडगाव शेरी परिसरातही अशाचप्रकारे ‘ऑक्सिजन पार्क’ होणार आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे हवेतील प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन वाढावा यासाठी उभारण्यात येणाऱ्या या पार्कच्या उभारणीत प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचा मुख्यस्रोत असलेल्या वृक्षांवरच कुऱ्हाड पडणार आहे. ऑक्सिजन पार्कसाठी अडथळा ठरणारी चिंच, कडुलिंब, बाभूळ अशा ५९ झाडांची कत्तल करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी मागितली आहे. 

आता महापालिकेने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने ‘ऑक्सिजन देणारे वृक्ष तोडून ऑक्सिजन पार्क कसा साकारणार,’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावेळी जास्तीत जास्त वृक्ष वाचवून उद्यानाच्या कामास हिरवा कंदील दाखवला आहे. खराडी आणि वडगाव शेरी परिसरातील सर्व्हे क्रमांक ३० मध्ये सार्वजनिक उद्यान नसल्याने स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांच्या पुढाकाराने सात एकर क्षेत्रात ‘ऑक्सिजन पार्क’ विकसित करण्यात येत आहे. उद्यानासाठी वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ‘कॉर्पोरेट एन्वायर्न्मेंट रिस्पाॅन्सबिलिटी फंडा’तील (सीएसआर) निधी यासाठी वापरला जाणार आहे. गेल्या वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. ‘ऑक्सिजन पार्क’मध्ये फ्लॉवर गार्डन, लहान मुलांसाठी साहसी खेळ, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, ओपन जीम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा आदी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.

उद्यानाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले असून आता प्रस्तावित जागेत पूर्वीपासून असलेले मोठे वृक्ष नियोजनात अडथळा ठरत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  त्यामुळे ‘ऑक्सिजन पार्क’च्या समन्वयक, सहायक अभियंता जान्हवी रोडे यांनी उद्यान विभागाकडे गेल्या महिन्यात ५९ वृक्ष तोडण्यासाठी परवानगी मागितली आहे. यात विलायती चिंच (२१ वृक्ष), करंज (१), कॅशिया (१), चेरी (५), कडुलिंब (३), शिवरी (१), निलगिरी (१६), बाभूळ (५), सुबाभूळ (४), वठलेले वृक्ष (२) अशी ५९ झाडे तोडावी लागणार असल्याचे नमूद केले आहे.

वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत अंतिम निर्णय

नगर रोड, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या वृक्ष अधिकाऱ्यांनी प्रस्तावित जागेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. याबाबत वृक्ष अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालामध्ये २७ झाडे पूर्ण काढावी लागणार असल्याचे नमूद केले आहे. तसेच ३२ झाडांचे पुनर्रोपण करावे, तसेच वृक्ष संवर्धन नियमानुसार नवीन ८२५ झाडांची लागवड करावी, असा अभिप्राय देण्यात आला आहे.

सीविक मिररच्या प्रतिनिधीने पार्कच्या प्रस्तावित ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. नियोजित उद्यानाच्या ट्रॅकमध्ये आणि गेटच्या बांधकामामध्ये काही झाडांचा अडथळा ठरत असल्याचे आढळले. त्यामुळे एकूण ३२ वृक्षांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. 

त्याचबरोबर २७ वृक्ष पूर्णपणे काढून टाकावी लागणार आहेत. वृक्ष लागवडीच्या नवीन नियमावलीनुसार आयुक्त किंवा प्रशासकांनी यास मान्यता देण्याची गरज आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story