खंडोजीबाबा चौक ट्राफिक सिग्नल
राजानंद मोरे/ तन्मय ठोंबरे
rajanand.more@civicmirror.in
TWEET@Rajanandmirror
पुणे महापालिका व स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये नव्याने सिग्नल यंत्रणा उभारली जात आहे. या स्मार्ट सिग्नल्सच्या आधारे प्रमुख चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढला जाणार आहे, पण त्याआधीच सध्याच्या कामामुळे त्याचा अडथळा ठरत असल्याचे पाहणीत समोर आले आहे. अनेक चौकांमध्ये सध्या सुरू असलेल्या सिग्नलसमोरच नव्याने सिग्नलचे खांब व दिव्यांचा सांगाडा उभा केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना चालू स्थितीतील सिग्नल दिसण्यात अडचणी येत आहेत. तसेच मागील अनेक दिवसांपासून ही कामे सुरू असून अद्याप एकही सिग्नल सुरू झालेला नाही.
शहरांतील जवळपास अडीचशेपेक्षा अधिक प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा आहे. वाहतूक पोलिसांच्या मागणीनुसार हे सिग्नल उभारले जातात. प्रत्येक चौकातील वाहनांच्या वर्दळीनुसार सिग्नलच्या रस्तानिहाय वेळा निश्चित केल्या जातात. त्यामुळे ठराविक वेळेत सिग्नल लाल, हिरवे होतात. संबंधित रस्त्यावर वाहने असो अथवा नसो, ठरलेल्या वेळेनुसार सिग्नलचे काम सुरू असते, पण अनेकदा हिरवा सिग्नल असलेल्या रस्त्यावर वाहने नसतात. तर लाल सिग्नल असलेल्या रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागलेली असते. अशावेळी ही यंत्रणा कुचकामी ठरते. वाहनचालकांचा संयम सुटतो आणि मग सिग्नल तोडून वाहने दामटण्याचे प्रकार घडतात. त्यावरच पुणे स्मार्ट सिटीने उपाय शोधला असून त्या अंतर्गत अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभारली जात आहे. त्यामध्ये गर्दीनुसार सिग्नलचे दिवे लागणार आहेत.
खरेतर मागील चार-पाच वर्षांपासून या प्रकल्पावर काम सुरू आहे. त्याला नुकताच मुहूर्त मिळाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटीला पुणे महापालिकेकडून सहकार्य केले जात आहे. कोणत्या चौकांमध्ये सिग्नल बसवायचे, याबाबत दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी चौक निश्चित केले आहेत. त्यानुसार खासगी ठेकेदाराकडून हे काम करून घेतले जात आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास १२५ सिग्नलची निवड करण्यात आल्याचे समजते, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सिग्नल उभारले जाणार आहेत. हे काम ३१ मार्चपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. अन्यथा निधी खर्च करता येणार नाही, याची भीती आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर याविषयी महापालिकेतील अधिकारी म्हणाले, मागील काही वर्षांपासून त्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित होता. आता हे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. हे सर्व काम स्मार्ट सिटीकडून केले जात आहे. सध्या खांब उभारून त्यावर दिवे लावले जात आहेत. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर जुने दिवे व खांब काढले जातील. सध्या अनेक चौकांमध्ये सध्याच्या सिग्नलचे खांब जुने झालेले नाहीत. त्यावरच नवीन दिवे बसविले जाऊ शकतात, पण काही तांत्रिक मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून पूर्ण सांगाडाच बदलला जात आहे.
तांत्रिक बाबी तपासून सर्व दिवे योग्य प्रकारे सुरू होईपर्यंत जुने बंद करता येणार नाहीत. हे कामही स्मार्ट सिटीकडूनच केले जाणार आहे.
सध्या अनेक चौकांमध्ये वाहनचालकांना एकाच ठिकाणी चालू व बंद स्थितीतील दोन सिग्नलचे दिवे दिसत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचे चित्र आहे. समोरचा सिग्नल बंद दिसल्याने काहीजण वाहने जोरात दामटत आहेत, तर त्यामागचा सिग्नल लाल असल्याचे पुढे गेल्यावर दिसते. मागील काही दिवसांपासून अशीच स्थिती आहे. नवीन दिवे तातडीने सुरू करून जुने हटवणे अपेक्षित आहे. त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. तसेच नवीन खांबांसाठीही लाखो रुपये खर्च केले जात आहेत. 'पुणे सेव्ह ट्राफिक मूव्हमेंट'चे प्रमुख हर्षद अभ्यंकर यांनीही हा मुद्दा उपस्थित करून तातडीने कामे पूर्ण करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्या अनेक चौकांमध्ये जुने आणि नवे असे सिग्नल दिसत आहेत. अर्थात एक बंद असला तरी वाहनचालकांमध्ये संभ्रम होतो. तसेच नव्याने खांब उभारण्यापेक्षा चांगल्या असलेल्या जुन्या खांबांवरच नवे दिवे बसविले जाऊ शकतात. पण त्यासाठीही निधी खर्च केला जात आहे. ३१ मार्चअखेरपर्यंत निधी खर्च करायचा असल्याने त्यांची घाई सुरू असल्याचे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल म्हणाले, ‘अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत नवीन सिग्नल यंत्रणा उभारली जात आहे. हे काम स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू आहे. महापालिकेकडून त्यांना चौक निश्चित करण्यासाठी मदत केली आहे. कनिष्ठ अभियंता नरेंद्र लघाटे यांनी सांगितले की, ‘नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर जुने सिग्नल हटवले जाणार आहेत. विविध रस्त्यांनुसार सध्या सिग्नल बसविले जात आहेत. एकाचवेळी त्या रस्त्यावर यंत्रणा सुरू करण्याचे नियोजन असावे.’
नवीन सिग्नल यंत्रणेमध्ये कॅमेरा तसेच ब्ल्यू टूथवर आधारित सेन्सर असतील. चौकातील वाहनांच्या गर्दीची माहिती नियंत्रण कक्षाकडे पाठविली जाईल. त्यानुसार सिग्नलच्या वेळांमध्ये बदल करता येऊ शकतो. त्यामुळे वाहनांचा चौकात थांबण्याचा वेळ कमी होईल. तसेच चौकांमध्ये होणारे प्रदूषणही काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. सिग्नल यंत्रणा अधिक प्रभावी करण्याच्या हेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, पण त्याला होत असलेल्या विलंबामुळे वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.