आमची मन:स्थिती द्विधा, लोकहो, तुम्हीच सांगा!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवकांनी नागरिकांनाच साद घालत आम्ही कोणता निर्णय घ्यावा, अशी विचारणा करीत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 13 Jul 2023
  • 12:45 am
आमची मन:स्थिती द्विधा, लोकहो, तुम्हीच सांगा!

आमची मन:स्थिती द्विधा, लोकहो, तुम्हीच सांगा!

साहेब की दादा, राष्ट्रवादीचे इच्छुक एसएमएस, व्हॉट्सअॅपद्वारे मागताहेत जनमताचा कौल

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirro

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवकांनी नागरिकांनाच साद घालत आम्ही कोणता निर्णय घ्यावा, अशी विचारणा करीत आहेत.

सध्या महापालिकेत प्रशासकीय राज असल्याने नगरसेवकांची मुदत संपली असल्याने निवडणुका कधी होणार हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ४१ आमदारांना घेऊन भाजप-शिवसेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आठ दिवसांपूर्वी झालेल्या या राजकीय नाट्यानंतर शरद पवार विरूद्ध अजित पवार असा थेट संघर्ष पहायला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या भाजपाचे ७७ नगरसेवक आहेत. तर ५ अपक्षांनी भाजपाला समर्थन दिल्याने महापालिकेत भाजपाचे ८२, तर राष्ट्रवादीचे ३६ सदस्य होते.  शिवसेनेचे ९ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक उमेदवार निवडून आला होता. दरम्यान, राज्यातील या सत्तानाट्यावर नागरिकांकडून मतदार म्हणून अत्यंत तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पाच वर्ष ज्या नागरिकांच्या बरोबर राहून कामे केली आता त्याच नागरिकांचा विरोधी पक्षाबरोबर झालेल्या युतीमुळे रोष पत्करावा लागण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या चार नगरसेवकांनी थेट आपल्या प्रभागातील मतदारांना एसएमएस आणि व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे साद घातली आहे.

‘‘आज वेळ बदलली, पण घड्याळ तेच आहे,’’ असे म्हणत एका नगरसेविकेने, ‘‘मी शहराची विकसक म्हणून अजित पवार यांच्याबरोबर रहावे की पक्षाची विचारधारा म्हणून शरद पवार यांच्यासोबत राहावे,’’ अशी विचारणा मतदारांना केली आहे.

उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून ओळख असलेल्या पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या भागाला लागून असलेल्या एका नगरसेवकाने याचप्रकारे मतदारांना कौल मागितला आहे. तो म्हणतो, ‘‘आपण एकाच कुटुंबातील सदस्य आहोत. कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांना विचारूनच पुढील पाऊल उचलावे, असे म्हणतात. त्यामुळे मी तुम्हाला आज या मेसेजद्वारे माझा निर्णय काय असावा, अशी विचारणा करीत आहे. प्रत्येकाची मते भिन्न असू शकतात. पण त्यातून सर्वांचा कल कुठे आहे, ते पाहूनच माझी पुढील राजकीय वाटचाल निश्चित करण्याचा माझा मानस आहे. त्यामुळे आपण मला मार्गदर्शन करावे.’’

पिंपरी-चिंचवड महापालिकेत चार वॉर्डचा एक प्रभाग करण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्डात किमान ५ ते ८ हजार मतदार आहेत. त्यामुळे एका प्रभागातील मतदारांची संख्या ही किमान २० ते ३२ हजार एवढी असून, आता निवडणुकीचे वारे नसले तरी मतदारांच्या मोबाईलवर एसएमएस आणि व्हॉट्सॲप मेसेज येऊन धडकू लागले आहेत.

निगडी प्राधिकरण, पिंपरी येथील दोन नगरसेवकांनीदेखील अशाच पद्धतीचे मेसेज मतदारांना पाठविले असून, काहींनी त्यावर ‘‘तुम्ही आता राजकारणच सोडून द्या,’’ असाही भन्नाट रिप्लाय केला आहे. तर काही जणांनी ‘‘तुम्ही कुठेच जाऊ नका. आम्हीच आता येथून कुठे तरी दुसरीकडे जाऊ राहतो,’’ असे मेसेज करीत माननीयांची फिरकी घेतली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील ९ नगरेसवकांपैकी काहींनी उद्धव ठाकरे गटात थांबणे पसंत केले होते. तर काहींनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. महापालिकेतील १२८ नगरसेवकांमध्ये काहीजण पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. या युवा नगरसेवकांचे शहरातील स्वपक्षाच्या बड्या नेत्यांबरोबर मागील पाच वर्षात या ना त्या कारणाने वाद झाले होते. त्यामुळे काहींनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. तर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवून, त्यादृष्टीने आगामी महापालिका निवडणुकीची तयारी केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story