'सिटीझन फोरम फॉर पॉटहोल्स/रोड सोल्यूशन्स' मंचाच्या बैठकीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता.
सीविक मिरर ब्यूरो
feedback@civicmirror.in
सीविक मिररच्या ‘सिटीझन फोरम फॉर पॉटहोल्स/रोड सोल्यूशन्स’ (सीएफपीआरएस) मंचाच्या आता विभागनिहाय बैठका सुरू होत आहेत. मंचाची बैठक औंधमध्ये येत्या शनिवारी (ता.१४) पार पडणार आहे.
‘सीएफपीआरएस’ मंचाची पहिली सर्वसाधारण बैठक मागील महिन्यात झाली. येत्या पावसाळ्यात पुणेकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळावेत. यासाठी मंचाने महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे शिफारशी पाठवल्या आहेत. आता दुसरी बैठक औंध विभाग डोळ्यासमोर ठेवून होणार आहे. यात औंध भागातील नागरिकांच्या गैरसोयीस कारणीभूत ठरणारे रस्ते आणि खड्डे केंद्रस्थानी असणार आहेत. या बैठकीनंतर मंचाकडून औंधमधील रस्ते आणि खड्ड्यांबाबत शिफारशी महापालिकेकडे पाठवल्या जाणार आहेत. या भागातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, यासाठी मंच प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी या भागातील क्षेत्रीय अधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
नागरिकांनी केलेल्या विनंतीनुसार या बैठकीत भागातील इतरही समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. मंचाचे सदस्य आणि रोटरियन नितीन जोशी यांनी बैठकीचे यजमानपद स्वयंस्फूर्तीने स्वीकारले आहे. याबद्दल जोशी म्हणाले, ‘‘प्रशासनाशी निगडित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नागरिकांनी सक्रियपणे पुढाकार घेणे, अतिशय महत्त्वाचे आहे. तुमचा परिसर आणि शहर राहण्यासाठी अधिक चांगले करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. अतिशय महत्त्वाची मोहीम हाती घेतल्याबद्दल मी ‘सीविक मिरर’चे आभार मानतो.’’
या बैठकीला औंधसह बाणेर आणि बालेवाडीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सीविक मिरर’च्या वतीने करण्यात येत आहे. या बैठकीची वेळ शनिवार (ता.१४) दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० अशी आहे. ही बैठक अविक पॉलिकेम, ११६, प्रोफाईल गार्नेट, विश्वराज गेट. आनंद पार्क, औंध असे आहे. (गुगल मॅपच्या सहाय्यानेही तुम्ही बैठकीच्या स्थळी पोहोचू शकता.)
चला, आपण सगळे एकत्र येऊन शहराच्या कल्याणासाठी नागरिकांचा एक भक्कम मंच बनवूया.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.