‘कल्पक’ खर्चाच्या चौकशीचे आदेश

दहा महिन्यांपासून बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्तांच्या बंगल्याच्या स्वच्छतेसाठी तब्बल २५ लाखांचे साहित्य क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने खरेदी केले आहे. मात्र, प्रत्यक्षात एका वर्षासाठी एवढा खर्च येतो का ? हा प्रश्न आहे. या खरेदीबाबत शहरातील स्वयंसेवी संस्थाकडूनही प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याची दखल अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतली आहे. या संदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन देत आयुक्त कार्यालयाने क्षेत्रीय कार्यालयाकडून सर्व माहिती मागवली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Feb 2023
  • 12:42 pm
‘कल्पक’ खर्चाच्या चौकशीचे आदेश

‘कल्पक’ खर्चाच्या चौकशीचे आदेश

महापौर, आयुक्तांच्या बंद बंगल्यांच्या स्वच्छतेसाठी २५ लाखांचा खर्च

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

दहा महिन्यांपासून बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्तांच्या बंगल्याच्या स्वच्छतेसाठी तब्बल २५  लाखांचे साहित्य क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाने खरेदी केले आहे. मात्र, प्रत्यक्षात एका वर्षासाठी एवढा खर्च येतो का ? हा प्रश्न आहे. या खरेदीबाबत शहरातील स्वयंसेवी संस्थाकडूनही प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याची दखल अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतली आहे. या संदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन देत आयुक्त कार्यालयाने क्षेत्रीय कार्यालयाकडून सर्व माहिती मागवली आहे.

या प्रकारामुळे "ही बंगल्यांची नाही, तर महापालिकेची तिजोरी "साफ' करण्याचा प्रकार आहे, अशी टीका होत आहे. घोले रस्ता- शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयामार्फत महापौर बंगला तसेच पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या स्वच्छतेचे काम पाहिले जाते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी नियमित स्वच्छता होते. यावर्षीही क्षेत्रीय कार्यालयाने या दोन्ही बंगल्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडे स्वच्छतेसाठी साहित्याची मागणी केली.

त्यानुसार भांडार विभागाने या स्वच्छता साहित्याची खरेदी केली असून, ती जवळपास २५  लाखांची आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेचा महापौर बंगला १५  मार्च २०२२ पासून बंद आहे. महापालिका सदस्यांची मुदत संपल्याने हा बंगला प्रशासनाने ताब्यात घेतला असून, तेथे कोणीही राहत नाही. तरीही त्याच्या स्वच्छतेसाठी साहित्य खरेदी करण्यात आली.

महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याची स्वच्छता घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाते. त्यासाठी भांडार विभागाकडून विविध सामग्रीची खरेदी केली जाते. महापौर बंगला जो मागील वर्षांपासून बंद आहे आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी २०२२ -२३  या सालासाठी स्वच्छता विषयक सामग्री खरेदी करण्यात आली. ज्यामध्ये विविध प्रकारच्या ३० वस्तूंचा समावेश आहे. यात सुगंधी तेल, ब्लॅक फिनेल, डांबर गोळी, फ्लोअर क्लिनर, कमोड घासण्याचा ब्रश, काच पुसण्याची नॅपकिन, चहाचा कप, चहा ट्रे, रूम फ्रेशनर आदींचा समावेश आहे.  

ही खरेदी भांडार विभागाकडून करण्यासाठी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रस्ताव प्राप्त झाला. त्यानुसार भांडार विभागाने टेंडर प्रक्रिया राबवत ही खरेदी केली. 'कल्पक इंटरप्रायजेस'  या कंपनीला हे काम देण्यात आले. ज्यासाठी २४ लाख ५९ हजारांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र दोन बंगल्यासाठी एवढा खर्च होऊ शकतो का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या बाबीची दखल घेतली आहे. आयुक्तांनी याबाबत संबंधित अतिरिक्त आयुक्त, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय आणि आयुक्त कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून खुलासा मागवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, क्षेत्रीय कार्यालयाने याबाबत आयुक्त कार्यालय यांच्याकडे बोट दाखवले आहे. आता आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यानंतर सर्व गोष्टी समोर येणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story