मतमतांतरे काही दिग्गज मराठी माणसांची, महाराष्ट्र दिनानिमित्ताने
प्रिन्स चौधरी
आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ रघुनाथ माशलेकर: ‘महाराष्ट्राने एक महान राज्य म्हणून आपले नाव कोरणे गरजेचे आहे. या विकसनशील देशात एकमेव विकसित राज्य होण्यासाठी आपल्या प्रतिभा उंचावल्या पाहिजेत. तंत्रज्ञान, उद्योजकतेच्या बळावर भविष्य घडविण्यासाठी सज्ज होण्याची हीच वेळ आहे.
मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते मोहन आगाशे: ‘खरं तर हा आपल्या राज्याचा वाढदिवस आहे. पण आपण एकच दिवस महाराष्ट्रीय बनायचे का? खरे तर हे सेलिब्रेशन वर्षभर व्हायला हवे. इथे जन्माला आलात की तुम्ही आयुष्यभर महाराष्ट्रीय म्हणून ओळखले जावोत, हीच ओळख मला जास्त भावते.
संगीतकार आणि गायक कौशल इनामदार: ‘१ मे हा महाराष्ट्र राज्याला जन्म देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०६ हुतात्म्यांच्या स्मरणाचा दिवस आहे. १९५० मध्ये इतर राज्ये सहज निर्माण झाली, पण प्रदीर्घ संघर्षानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र अस्तित्वात आला. आम्हाला ते सहज मिळाले नाही, आम्ही ते मिळवले.
पत्रकार आनंद आगाशे: ‘मी कृतज्ञ भावनेने सर्व महाराष्ट्रीय बांधवांचे या महत्त्वाच्या दिवशी अभिनंदन करतो. देशातील चांगल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राची गणना होते. गेल्या ६३ वर्षांतील आपल्या प्रभावी कामगिरीचा लेखाजोखा मांडण्याची आता गरज आहे. बेजबाबदारपणा, वाढती आर्थिक विषमता, भयावह सामाजिक विसंगती, सार्वजनिक जीवनातील चारित्र्याचा अभाव या क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे.'
'परिसर' संस्थेचे रणजित गाडगीळ: ‘महाराष्ट्राची ५०% लोकसंख्या शहरात राहते. गर्दी, प्रदूषण आणि हवामान बदलाचा धोका ही आता नवी आव्हाने आहेत. शहरी सुधारणांची ही योग्य वेळ आहे. सर्व रहिवाशांसाठी सर्वसमावेशक, शाश्वत विकास काळाची गरज आहे.
कादंबरीकार मंजिरी प्रभू: ‘मी नेहमीच स्वत:ला जागतिक नागरिक मानत आले आहे, पण मला सर्वप्रथम महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे. महाराष्ट्र दिन म्हणजे खरे तर मराठीच्या सर्व गोष्टींची पावती आहे - समृद्ध मराठी भाषा आणि साहित्याचा वारसा तर आहेच शिवाय इथली माणसे काळाच्या खूप पुढे आहेत. सुंदर समुद्रकिनारे आणि पर्वत, प्राचीन गुहा आणि मंदिरे, हिरवीगार जंगले आणि धर्म, विज्ञान, संगीत आणि कला यांचे मिश्रण करणारी २००० वर्षाची संस्कृती सगळं सगळं इथेच आहे.
इंद्रनील चितळे (चितळे समूहाची चौथी पिढी): ‘महाराष्ट्रात जन्म घेणे हा बहुमान आहे. महाराष्ट्राची पारंपरिक लोकसंस्कृती असो किंवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आलेले नवे विचार असोत. संपूर्ण इतिहासात महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र घडवणाऱ्या लोकांचे योगदान फार मोठे आहे.
भूजल शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे: 'आजचा मराठी तरुण मराठी असण्याचा भाव विसरला आहे, पण १ मे हा दिवस लक्षात ठेवण्याचा दिवस आहे. आपली खरी ओळख जाणून घेण्याचा आणि जगाला मराठी असण्याचे अस्तित्व दाखवण्याचा दिवस आहे. आपण आपल्या संस्कृतीकडे मागे वळून पाहिले पाहिजे. प्रथम सुपर कॉम्प्युटर बनवणारे; पहिली महिला शिक्षिका, पहिली डॉक्टर आणि पहिली राष्ट्रपती असोत की इंग्रजांविरुद्ध शस्त्रे उचलणारा क्रांतिकारक ही सगळी मराठी नावे आहेत. संविधान लिहिणारे आंबेडकर आणि स्वराज्य घडवणारे छत्रपती शिवराय. ही यादी अंतहीन आहे.
माजी कसोटीपटू
हृषीकेश कानिटकर:
‘मराठी भाषक महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. फिल्म इंस्टिट्यूट ते व्ही शांताराम यांचे राजकमल कलामंदिर, मोठे उद्योग, शैक्षणिक संस्था, क्रीडासंकुल आदी बाबींसह देशाच्या विकासात महाराष्ट्राचे सर्वाधिक योगदान हेच आपले राज्य देते. दक्षिण कमांडचे मुख्यालय; नौदलाचे केंद्रही हेच राज्य आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक योगदान कुठल्या राज्याचे असेल तर ते महाराष्ट्राचेच.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.