फक्त १५० ‘स्लीपर’ची पोलिसांकडे नोंद
रोहित आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
नोकरी-कामधंद्यासाठी पिंपरी-चिंचवड येथे आलेले नागरिक गावाला ये-जा करण्यासाठी वापर करत असलेल्या स्लीपर कोचसह आरामदायी बसपैकी केवळ १५६ बसची नोंद पोलिसांकडे आहे. सध्या वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून तपासणी मोहीम सुरू असताना ही बाब उघडकीस आली. या विशेष मोहिमेत दोन लाखांचा दंड बसचालकांकडून वसूल करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर स्लीपर कोचसह आरामदायी बसचा आढावा पोलिसांकडून घेतला गेला. त्यावेळी तब्बल १५६ बस शहरातून प्रवासी घेऊन बाहेर पडत असल्याचे समोर आले, पण हा आकडा केवळ नोंदणीचा असून, यापेक्षा अधिक बस शहरातून धावत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे १४०० मोठ्या कंपन्या सुरू असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. राज्याच्या काना-कोपऱ्यातून आलेले दीड ते पावणे दोन लाख कामगार या ठिकाणी काम करीत आहेत. उन्हाळ्याची सुटी आणि मोठ्या सणांना स्लीपर कोचने प्रवास करणारी मंडळी जास्त आहेत.
या पार्श्वभूमीवर रस्त्यावर होणारे प्रवासी बसेसचे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या अंमलबजावणी व उपाययोजनांबाबत परिवहन आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्लीपर बस, स्कूल बस, टूरिस्ट बस तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत रास्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे म्हणजे स्पीड गव्हर्नर, आपत्कालीन दरवाजा, रिफ्लेक्टर्स, वाईपर्स, इंडिकेटर्स, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार सुविधा व आवश्यक कागदपत्रे आदी बाबींची तपासणी करण्यात येत आहे. तसेच, बसचालकांची ब्रेथ ॲनलायझरद्वारे तपासणी करून मद्यपान करून बस चालवणाऱ्यांवर कारवाई होत आहे. या मोहिमेअंतर्गत १९६ प्रवासी बसेसची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये एकूण ८० वाहने दोषी आढळून आलेली आहेत. तसेच एका बसचालकाने मद्यपान करून वाहन चालवल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत २ लाख ७२ हजार २०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.