विनयभंगाचे ऑनलाईन गुन्हे सायबर सेलकडे
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
इन्स्टंट लोन, तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून महिलांचा विनयभंग करण्यात आलेली दहा प्रकरणे तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे देण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ७ गुन्हे आयटी पार्क, हिंजवडी परिसरातील असून, चिंचवडमधील २ तर निगडी भागातील एक गुन्हा आहे.
कोरोनाच्या काळानंतर अनेक जणांनी इंटरनेटवरून 'इन्स्टंट लोन' घेतले होते. झटपट लोनमध्ये अनेक बाबींची खातरजमा न करता कर्ज दिले जाते. मात्र, परतावा करताना वाद होणे आणि महिला कर्जदार असल्यास तिचा विनयभंग होण्याचे प्रकार शहरात सातत्याने घडले आहेत. त्याचबरोबर काही प्रकरणांमध्ये इन्स्टाग्राम, तसेच फेसबुकच्या माध्यमातूनही विनयभंग करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. आरोपींकडून बनावट नावाने अकाऊंट तयार करून महिला-मुलींचा विनयभंग करण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून प्राथमिक पातळींवर तपास केला जातो. विनयभंग-बलात्काराच्या गुन्ह्यात ६० दिवसांत आरोपपत्र सादर करण्याच्या सूचना महासंचालक कार्यालयाकडून सर्व पोलिसांना देण्यात आल्या आहेत. साहाय्यक पोलीस आयुक्त आणि उपायुक्त महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांचे आरोपपत्र ६० दिवसांत न्यायालयात सादर होते की, नाही याची खातरजमा वरिष्ठ निरीक्षकांकडून करत असतात. मात्र, ऑनलाईन पद्धतीने किंवा फोनद्वारे विनयभंग झाल्यानंतर त्याच्या तपासात अनेक अडथळे येत आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आणि तपास रखडलेल्या गुन्ह्यांमध्ये इन्स्टंट लोनचे गुन्हे सर्वाधिक आहेत. महिलांनी झपटप लोन मिळत असल्याने कर्ज घेतल्यावर त्याच्या परतफेडीवरून वादंग निर्माण झाल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, यातील काही महिला कॉलसेंटरमध्ये नोकरी करणाऱ्यादेखील आहेत. त्याचबरोबर चायनीज मोबाईल ॲप्लिकेशनवर लॉगिन केल्यावर त्यातील टास्क आणि त्यातून झालेल्या फसवणुकीनंतर विनयभंग होण्याचे प्रकारदेखील घडले आहेत. त्यामुळे यातील आरोपींचा थांगपत्ताच लागत नाही.
काही आरोपी गुजरात किंवा राजस्थान या भागातील असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले. परंतु, तेथे आरोपींचे वास्तव्य नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकाराचे सात गुन्हे तपासासाठी सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहेत. निगडी भागातील एका खासगी हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर टिळक चौकात येणाऱ्या दोन तरूणींना रस्त्यात अडवून एका दुचाकीस्वाराने त्यांचा विनयभंग केला होता. तरुणाने हेल्मेट घातले असल्याने आणि त्याच्या दुचाकीचा नोंदणीक्रमांक 'सीसीटीव्ही'त नीट दिसत नसल्याने हा तपास प्रलंबित आहे. पोलिसांनी तरूणींकडे चौकशी केल्यावरही त्यातून काहीच हाती लागले नसल्याने हा तपासदेखील आता सायबर सेलकडे देण्यात आला आहे.
चिंचवड भागातील गुन्ह्यांमध्येही सोशल मीडियावरील अकाऊंटच्या माध्यमातून विनयभंग करण्यात आल्याची दोन प्रकरणे आहेत. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींनी सोशल मीडियाचे अकाऊंट सुरू करताना जो मोबाईल क्रमांक दिला होता, तो भलत्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे आणि ती व्यक्ती आता सापडत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या दोन गुन्ह्यांचा मागही आता सायबर सेलचे पथक काढणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.