संजय राऊत धमकीप्रकरणी पुण्यात एकाला अटक

खासदार राऊतांना दिली होती ‘एके-४७’ने उडवण्याची धमकी; आरोपीला खराडीतील हॉटेलमधून घेतले ताब्यात

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 2 Apr 2023
  • 01:54 pm
संजय राऊत धमकीप्रकरणी पुण्यात एकाला अटक

संजय राऊत धमकीप्रकरणी पुण्यात एकाला अटक

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'दिल्लीत आल्यावर एके ४७ ने उडवून टाकू' असा धमकी देणारा संदेश राऊत यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई आणि पुणे पोलीस यांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत पुण्यातून एकाला ताब्यात घेतले आहे. राहुल तळेकर (वय २३ ) या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने शुक्रवारी (३१ मार्च) रात्री उशिरा अटक केली आहे. त्याला  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

'तू दिल्लीमध्ये भेट तुला एके ४७ ने उडवतो, तुझा मुसेवाला करतो, तू आणि सलमान फिक्स, अशा आशयाचे धमकीचे मेसेज खासदार राऊत यांच्या व्हाट्स ॲपवर पाठवण्यात आले होते. लॉरेन्स बिष्णोई या कुख्यात टोळीच्या नावाने हे संदेश पाठवण्यात आले आहेत. संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नाव असून त्यांनी पत्रकारितेमध्ये अनेक वर्षे गुन्हेगारीवरील बातमीदारी करण्याचे काम केले आहे. ते गुन्हे बातमीदारीमध्ये तज्ज्ञ मानले जायचे. त्यांच्या दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांच्यावरील आणि गुन्हे जगतातील इतर बातम्यांबद्दल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायची. संजय राऊत यांनी धमकीची माहिती शुक्रवारी पोलिसांना दिली होती.

राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी शनिवारी सकाळी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती आमदार सुनील राऊत यांनी दिली. सिद्धू मुसेवालाच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार पुण्यात सापडले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही गोष्टी गंभीरपणे घेत प्रामाणिक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खराडी परिसरातील जयशंकर हॉटेलमधून राहुल तळेकरला ताब्यात घेतले आहे. तो वडगाव शेरी येथे राहात असून त्यास पुढील तपासाकरिता मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी शनिवारी दिली.

मुंबई पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही धागेदोरे मिळाले होते. त्यानुसार एक संशयित पुण्यात असल्याची माहिती त्यांनी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेस कळवली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित आरोपीचा तपास करत खराडी, चंदननगर परिसरातून राहुल तळेकर याला ताब्यात घेतले. तळेकर हा जयशंकर हॉटेलमध्ये काम करतो. तो मूळचा जालना येथील रहिवासी आहे. दारूच्या नशेत त्याने हा धमकीचा संदेश पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने संजय राऊत यांना अनेक वेळा फोन केला. मात्र राऊत यांनी फोन न उचलल्याने धमकीचा संदेश पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने अशाप्रकारचे कृत्य कशासाठी केले आहे. त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी नेमका काय संबंध आहे, याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

संजय राऊत यांना धमकी देणारा माणूस पकडला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दारूच्या नशेत त्या व्यक्तीने संजय राऊत यांना धमकी दिली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल. धमकी देणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कोणी कोणाला धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही, अशी देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story