‘एक्स्प्रेस-वे’ वर अपघातच ‘सुसाट’
सीविक मिरर ब्यूरो
पुणे- मुंबई एक्स्प्रेस-वेवर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरडी कोसळण्यापासून वाहनांच्या धडकेमुळे होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून, यामुळेच एक्स्प्रेस-वेवर वाहनांच्या वेगालाही मर्यादा आल्या आहेत. बुधवारीदेखील खंडाळा बोगद्यात अपघात होऊन एक कंटेनर आडवा झाल्याने संपूर्ण बोगदा बंद झाला होता. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.
पावसाळा सुरू झाल्यापासून एक्स्प्रेस-वेवर दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीदेखील होते. दरड हटवण्यासाठी अनेक वेळा 'ब्लॉक' घ्यावा लागतो. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. २०२३ वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजे जानेवारी ते जून या कालावधीत एक्स्प्रेस-वेवर एकूण ७० अपघात झाले. यातील २६ जीवघेण्या अपघातांमध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. २० गंभीर अपघातांमध्ये ५४ जणांना गंभीर दुखापत झाली, तर काहींना अपंगत्व आले. अपघात झाल्यावर अनेक वेळा अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच पडलेली असतात. त्यामुळे वाहतूक विस्कळित होते.
खंडाळा बोगद्यात बुधवारी सकाळीही कंटेनर पलटी झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद झाली होती. घटनेची माहिती समजताच आयआरबी व देवदूत यंत्रणेने घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला.
‘सुसाट’ मात्र, त्यांनाही घटनास्थळी जाताना अमृतांजन पुलापर्यत जाऊन उलट्या दिशेने मागे जावे लागले.
काही दिवसांपूर्वी पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. दरड काढण्यासाठी एमएसआरडीसी आणि प्रशासनाने ट्रॅफिक ब्लॉक घेऊन दरड हटवली होती. त्यानंतर मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरू करण्यात आली होती. या मार्गावर जिथे दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाळ्या लावण्याचे काम देखील करण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांकडून दरडप्रवण क्षेत्राची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी घाटात थांबून दरडप्रवण क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडली तो डोंगर एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण जाळी लावून सुरक्षित केला असल्याचे त्यांनी सांगितले. कामशेत बोगद्याजवळ दुसऱ्या ठिकाणी कोसळलेल्या दरडीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. गरज पडेल तिथे धोकादायक डोंगराचा भाग पाडून तो भाग संरक्षक जाळी टाकून संरक्षित करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.