ढेरपोट्या पोलिसांचे ठाण्यातच 'वर्क आऊट'

ढेरपोट्या पोलिसांसाठी आता पिंपरी चिंचवडमध्ये सर्व पोलीस ठाण्यांच्या आवारात ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधीतून अडीच कोटी रुपये त्यासाठी देण्यात आले असून यातून जिमसाठी आवश्यक साहित्य पोलिसांना देण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 7 Apr 2023
  • 09:19 am
ढेरपोट्या पोलिसांचे ठाण्यातच 'वर्क आऊट'

ढेरपोट्या पोलिसांचे ठाण्यातच 'वर्क आऊट'

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ओपन जिम; अधिकारी, कर्मचाऱ्यांना गाळावा लागणार घाम

ढेरपोट्या पोलिसांसाठी आता पिंपरी चिंचवडमध्ये सर्व पोलीस ठाण्यांच्या आवारात ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधीतून अडीच कोटी रुपये त्यासाठी देण्यात आले असून यातून जिमसाठी आवश्यक साहित्य पोलिसांना देण्यात आले आहे.

पोलिसांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी शासनाकडून ठराविक निधी दिला जातो. मार्च महिन्यात ही रक्कम कोणत्या पोलिसांना द्यायची याचा निर्णय घेतला जात असतो. परंतु, सरसकट सगळ्याच पोलिसांना ही रक्कम मिळत नाही. त्याचबरोबर पोलिसांना व्यस्त कामातून वेळ मिळत नसल्याने आता पोलीस ठाण्याच्या आवारातच जीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपमुख्यमंत्री असताना शहरातील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यालाच 'जरा वजन कमी करा, व्यायाम करा' असा जाहीर सल्ला दिला होता. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून अडीच कोटी रुपयांचा निधी पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी मंजूर करण्यात आला होता.

मागणी आणि मंजुरी यामध्ये दीड वर्षांचा कालावधी गेला. पण आता सर्व साहित्य आयुक्तालयात आले आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या आवारात अंतर्गत जागा आहे तेथे क्लोज जीम तर ज्यांच्याकडे अंतर्गत जागा नाही त्यांना ओपन जीम तयार करून देण्यात येणार आहे. पोलिसांसाठी अनेक योजना आखण्यात येतात.

 परंतु, अधिकारी बदलताच या योजना बासनात गुंडाळून ठेवल्या जातात. आता अडीच वर्षांपूर्वी नियोजित असलेली योजना मूर्त स्वरूपात येत आहे. जीम बांधल्यानंतर पोलिसांना त्यासाठी वेळ देण्याची देखील गरज आहे. दैनंदिन कामकाज, बंदोबस्त आणि कमी मनुष्यबळ ही कारणे पुढे करून पोलीस कर्मचारी व्यायामासाठी वेळ देणे टाळतात.  त्यामुळे शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी व्यायामासाठी वेळ देण्याची गरज आहे.

पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाले. परंतु, एकाही पोलीस ठाण्यात अथवा मध्यवर्ती जीम अद्याप झालेली नाही. आता सगळीकडे जीम करण्यात येणार असल्याने कर्मचारी वर्गातून या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story