सायबर ठगांची आता नवी मोडस ऑपरेंडी

तुमच्या नावाने परदेशात पार्सल पाठविण्यात आले असून, त्यामध्ये काही अवैध वस्तूंचा समावेश होता. पोलीस कारवाई करायची असून, तुमचा त्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येत असल्याने तुम्ही अंधेरी मुंबई येथे या... अशा स्वरूपाचे फोन करून पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडमधील युवकाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 29 Mar 2023
  • 12:46 pm
सायबर ठगांची आता नवी मोडस ऑपरेंडी

सायबर ठगांची आता नवी मोडस ऑपरेंडी

परदेशात अवैध पार्सल पाठवल्याचे सांगून लाखोंची फसवणूक

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

तुमच्या नावाने परदेशात पार्सल पाठविण्यात आले असून, त्यामध्ये काही अवैध वस्तूंचा समावेश होता. पोलीस कारवाई करायची असून, तुमचा त्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येत असल्याने तुम्ही अंधेरी मुंबई येथे या... अशा स्वरूपाचे फोन करून पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडमधील युवकाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवरून फसवणूक करणारे एकच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात सायबर ठगांनी वरीलप्रमाणे नवी मोडस आॅपरेंडी वापरत लोकांना फसविण्यास सुरुवात केली आहे. पारुल चंद्रगुप्त शर्मा (वय २७, सध्या रा. निगडी प्राधिकरण) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे, तर अज्ञात मोबाईल क्रमांकधारकआणि पोलीस असल्याचे सांगणाऱ्या कथित अजयकुमार बन्सल नामक डीसीपीवर गुन्हा दाखल 

करण्यात आला आहे. अशा पद्धतीने गेल्या तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवडमध्ये चार जणांची फसवणूक करण्यात आली आहे. यापूर्वी ज्यांची फसवणूक करण्यात आली त्यांनादेखील अजयकुमार बन्सल याच नावाने पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करण्यात आली होती.

पारुल यांना ९ मार्चला ११ आकडी नंबरवरून एक फोन आला. तेव्हा संबंधित व्यक्ती कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगण्यात आले होते. ‘‘तुम्ही तैवान येथे एक पार्सल पाठविले होते आणि ते तैवान कस्टम डिपार्टमेंटने अडविले आहे. या पार्सलमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू असल्याने तुमच्यावर अंधेरी मुंबई येथे सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’’ असे सांगून नंतर त्या व्यक्तीने काॅल पुढील कारवाईसाठी अंधेरी ईस्ट सायबर पोलिसांकडे ट्रान्स्फर करीत असल्याचे भासविले. फोन होल्डवर ठेवून काही वेळातच बन्सलकुमार या व्यक्तीने अंधेरी ईस्ट सायबर पोलीस ठाण्यातून डीसीपी बोलत असल्याचे सांगत पारुल यांना धमकावले.

तुमच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगत, ज्या लोकांना पार्सल पाठविण्यात आले त्यांना त्यामधून आर्थिक फायदा झाला. तैवान देशात कोणत्या स्वरूपाचे पार्सल पाठविले आणि त्यातून फायदा म्हणून आतापर्यंत किती रक्कम आली, हे तपासण्याच्या नावाखाली पारुल यांच्याकडून ९ लाख ६१ हजार रुपये घेण्यात आले. कालांतराने हा फोन कॉल खोटा असल्याचे लक्षात आल्यावर पारुल यांनी निगडी पोलिसांकडे धाव घेतली.

कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नंतर हा फोन सायबर क्राईम विभागाला जोडत असल्याचे सांगून फसवणूक केली जात आहे. वारंवार हे प्रकार घडत असून, फसवणुकीसाठी वापरण्यात येणारे फोन नंबर आणि नावे एकसमान असल्याचे आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या चारही गुन्ह्यांवरून स्पष्ट होत आहे. तसेच ‘तुमचे आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रांचा वापर करून टांझानिया, तैवानसारख्या देशांत पार्सल पाठविण्यात आले असून, ते स्थानिक कस्टम डिपार्टमेंटने अडविले आहे. त्यामध्ये तीन बोगस पासपोर्ट आणि अन्य काही अवैध वस्तू आढळून आल्या आहेत. त्यामुळे फोन अंधेरी पोलिसांकडे ट्रान्स्फर करीत आहोत,’ असे सांगितले जात आहे.

अशा स्वरूपाच्या चार घटनांमध्ये एक साम्य पोलिसांना प्राथमिक तपासात आढळून आले आहे. या चारही फसवणूक करण्यासाठी त्यांच्या आधार कार्डचा क्रमांक सांगत विश्वास संपादन केला होता. निगडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story