आता ‘मड’ आयलँड पार्ट-II
विजय चव्हाण
कोरेगाव पार्क परिसराचे 'मड आयर्लंड' झाल्याचे वृत्त 'सीविक मिरर'ने प्रसिद्ध केल्यानंतर पुणे महानगरपालिका प्रशासनाने सामान्य नागरिकांना चिखलातून मुक्ती तर दिली नाहीच; पण अजून एक नवा धक्कादायक प्रकार करून अधिकाऱ्यांचे मेंदूच चिखलाने भरले आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या रस्ता दुरुस्ती विभागाने पावसाळ्यात साठलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी ' मेंन्टेनन्स व्हॅन' नेमल्या आहेत. चेंबरच्या आजूबाजूला असलेला गाळ आणि रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून गेल्यानंतर साठलेला चिखल काढण्यासाठी ही तजवीज केली आहे. पावसाळ्यात फूटपाथ आणि रस्त्याच्या कोपऱ्यात साठलेला हा चिखल उचलून नेण्याऐवजी तिथेच फूटपाथवर टाकून दिला आहे. गेल्या चार दिवसांत तो गाळ न उचलल्याने पावसाच्या संततधारेमुळे आधी तुलनेने स्वच्छ असलेला फूटपाथ चिखलमय झाला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आता पालिकेकडे तक्रार करूनही परिस्थिती जैसे थेच आहे.
स्थानिक रहिवासी आणि पुणे पालिकेत सहायक आयुक्त असलेले उमेश माळी म्हणाले, "रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली फूटपाथवर गाळ पसरून टाकला जात आहे. नॉर्थ मेन रोडवर सध्या फूटपाथ चालण्यायोग्य राहिलेला नाही. गाळ वेळीच न उचलल्यामुळे तिथे चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे.
अभिजीत वाघचौरे म्हणाले," जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळी वाहिन्या टाकण्याचे काम साऊथ मेन रोडच्या 'जी' लेनमध्ये रस्ते आणि मलनि:सारण विभागाने सुरू केले आहे. तातडीने काम संपवण्याऐवजी ठेकेदाराने गेले १५ दिवस काम बंद ठेवून राडारोडा तसाच ठेवला आहे. त्यातच संततधार पाऊस पडत असल्याने हे ओघळ आता पूर्ण परिसरात पसरल्याने पॉश कोरेगाव पार्कचे अक्षरश: 'मड' आयर्लंड झाले आहे, हा नवा प्रकार अधिकच त्रासदायक झालेला आहे. ज्येष्ठ नागरिक मुख्यत्वे फूटपाथचा वापर करतात. ते या चिखलावरून घसरून पडण्याची शक्यता आहे.
आजूबाजूला असलेले रहिवासी बंगले आणि सोसायट्या चिखल आणि राडाराेड्यामुळे आधीच त्रस्त आहेत. या संदर्भात अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली तरी ते सुधारत नाहीत, अशी प्रतिक्रिया आणखी एका नागरिकाने व्यक्त केली. आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने राडारोडा हटवण्याची विनंती केली आहे. तसेच रस्ता दुरुस्तही करण्याची मागणी केली आहे. पाऊस सुरू असल्याने अधिकचे मनुष्यबळ लावून काम तातडीने पूर्ण करावे, अशीही मागणी केली आहे, असेही ते म्हणाले.
पालिकेच्या मलनि:सारण विभागाचे अधिकारी म्हणाले, "स्थानिक नागरिकांच्या मागणीची दखल घेतली जाईल. आम्ही तातडीने धाव घेऊन हा फूटपाथवरचा गाळ काढून टाकू, रस्त्यावरील राडारोडा उचलून रस्ते धुवून स्वच्छ केले जातील. कोरेगाव पार्कमध्ये अनेक व्हीआयपींचे निवासस्थान आहे, तसेच ओशो आश्रम, छाबड हाऊस, जर्मन बेकरी अशी संवेदनशील ठिकाणेही आहेत. अनेक केंद्रीय संस्था तसेच शासकीय निवासस्थाने या परिसरात आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.