आता बनावट नोटीस आणि लुबाडणूक

महावितरणच्या नावाने मेसेज करून लुटीचे सत्र सुरू असताना चोरट्यांनी आता नोटीस पाठवून लुबाडायला सुरुवात केली आहे. विद्युत मंत्रालयाच्या नावे आणि सरकारी मोहर असलेल्या लेटरहेडवर ही नोटीस पाठवली जात आहे. कोथरूडमधील अनेक नागरिकांनी आपले बिल भरलेले नाही. ते न भरल्यास आपला वीज पुरवठा खंडित होईल, अशा स्वरूपाची नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 15 Mar 2023
  • 10:57 am
आता बनावट नोटीस आणि लुबाडणूक

आता बनावट नोटीस आणि लुबाडणूक

विद्युत मंत्रालयाच्या बनावट लेटरहेडवर पाठवली जातेय नोटीस; लिंक डाउनलोड केली की बँकेतून जातात पैसे

 विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

महावितरणच्या नावाने मेसेज करून लुटीचे सत्र सुरू असताना चोरट्यांनी आता नोटीस पाठवून लुबाडायला सुरुवात केली आहे. विद्युत मंत्रालयाच्या नावे आणि सरकारी मोहर असलेल्या लेटरहेडवर ही नोटीस पाठवली जात आहे. कोथरूडमधील अनेक नागरिकांनी आपले बिल भरलेले नाही. ते न भरल्यास आपला वीज पुरवठा खंडित होईल, अशा स्वरूपाची नोटीस पाठवण्यात आलेली आहे. या नोटीसला आलेल्या आणि त्यामुळे फसवल्या गेलेल्या काही नागरिकांनी महावितरणकडे तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे या ऑनलाईन चोरांना संबंधित ग्राहकाने महावितरणमध्ये किती बिल भरले याची माहितीही तत्काळ समजत असल्याने ग्राहक फसत आहेत.

नागरिकांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर एसएमएस, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बनावट संदेश पाठवला जातो. त्यात वीज पुरवठा तोडण्याची भीती दाखवलेली असते. अशा मेसेजला भुलून अनेक नागरिकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधलेला आहे. संबंधित क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर अॅप डाऊनलोड करायला सांगितले जाते. त्यावर गेल्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यातून पैसे वजा होतात. बहुतांश प्रकरणात ज्येष्ठ नागरिक याला बळी पडलेले आहेत, तर काही वेळा उच्च शिक्षितही याला बळी पडतात.

कोथरूडमधील सामाजिक कार्यकर्ते अमोल काळे म्हणाले, मला तीन दिवसांपूर्वी विद्युत मंत्रालयाच्या नावाने मोबाईलवर नोटीस पाठवण्यात आली. त्यात तुमचे मागचे वीज बिल थकलेले असून, लवकर भरण्याविषयी सांगितले होते. अन्यथा आपली वीज कापण्यात येईल, असा इशाराही त्यात देण्यात आला होता. नोटीसमध्ये मोबाईल क्रमांकही दिला होता. संबंधित क्रमांक पाहिला असता त्यावर संबंधित व्यक्तीने डिस्प्ले फोटो (डीपी) म्हणून महावितरणचा लोगो लावला होता. मला शंका आल्याने मी पैसे भरले नाहीत. कोथरूड परिसरातील अनेक नागरिकांना गेल्या काही आठवड्यांपासून असे  मेसेज येणे वाढले आहे. काहींची फसवणूक देखील झाली आहे. त्या विरोधात आम्ही काही नागरिकांनी एकत्र येत कोथरूडमधील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश साळुंके यांना निवेदन दिले आहे.

कोथरूडमधील रहिवासी अभिजित परदेशी म्हणाले, मला आणि आईला एकाच दिवशी बिल थकीत असल्याचा मेसेज आला. आईने मला फोन केल्यानंतर मी तातडीने पैसे भरून टाकले. तसे आईला कळवले. आईने संबंधित व्यक्तीला फोन करून बिल भरल्याचे सांग अन्यथा ते वीज कापायला येतील असे सांगितले. म्हणून मी संबंधित क्रमांकावर फोन केला. तेव्हा त्यांनी तुम्ही दुपारी ३९० रुपये भरले असल्याचे सांगितले. मात्र, तुमचे गेल्या महिन्याचे बिल आमच्या प्रणालीवर अपडेट झाले नसल्याचे सांगितले. त्यांनी बिल सांगितल्याने मला त्यांच्यावर विश्वास बसला. मात्र, काही कारणामुळे दोन मिनिटांत सांगतो म्हणालो. त्यांनी लगेच पोलिसांची धमकी दिली. त्यामुळे मला थोडा संशय आला. मग मी फोन कट केला. माझ्याबाबत ही घटना ३ मार्च रोजी घडली. तर, ७ मार्चला कोथरूडमधीलच माझ्या एका परिचिताच्या खात्यातून अशाच कॉलमुळे चार लाख रुपये गेले.

वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना ‘एसएमएस’, ‘व्हॉट्स ॲप’द्वारे बनावट संदेश पाठवण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक क्रमांकावरून आलेला बनावट संदेश किंवा कॉलवर विश्वास ठेवू नये. तसेच वैयक्तिक क्रमांकावरून रक्कम भरण्यासाठी पाठवण्यात आलेली कोणतीही ऑनलाइन लिंक ओपन करू नये अथवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. फेक मेसेजमध्ये ‘मागील महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याचे सांगितले जाते. बिल न भरल्यास आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्याकरिता सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जाते. याला ग्राहकांनी बळी पडू नये असे आवाहन महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी केले आहे.

ग्राहकांना काही शंका व तक्रारी असल्यास त्यांनी चोवीस तास सुरू असलेल्या १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर अथवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story