आता बँकही नाही सुरक्षित
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
पिंपरी-चिंचवडमध्ये भर चौकातील फेड बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याच्या प्रयत्नातील टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला. मात्र, सशस्त्र दरोडेखोरांकडून पोलिसांना लक्ष केले जात असतानाही वाकड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आठजणांपैकी चौघांना पकडले, यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
थेरगाव येथील डांगे चौकाजवळ फेड बँक आहे. या बँकेच्या शेजारील दुकान रिकामे आहे. त्यामुळे चोरट्यांनी शनिवारी (दि. ८) मध्यरात्रीनंतर दीड वाजता बंद दुकानाचे शटर उचकटून त्यामध्ये प्रवेश केला. त्यानंतर या दुकानाची आणि बँकेची सामायिक भिंत फोडण्यास सुरुवात केली.
भिंत फोडली जात असल्याचे या इमारतीत झोपलेल्या एका कामगाराच्या लक्षात आले. त्याने तत्काळ ही माहिती तो काम करीत असलेल्या व्यावसायिकाला कळविली. व्यावसायिकाने पोलिसांच्या ११२ या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून वाकड पोलिसांसह त्या परिसरात नजीक असणाऱ्या अन्य अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहचण्यास सांगितले.
वाकड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या थेरगाव मार्शल (गस्तीवरील पोलीस) यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत रात्री गस्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनीही आपला मोर्चा डांगे चौकाकडे वळविला. मार्शल ड्यूटीवरील दोन वाहने डांगे चौकात पोहचली. तेव्हा फेड बँकेच्या शेजारी असलेल्या एका दुकानाचे शटर तोडून आठ जण बँकेच्या भिंतीला भगदाड पाडत असल्याचे दिसले. पोलीस आल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी पोलिसांवर सशस्त्र हल्ला केला. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत झाली.
त्या अवस्थेतही त्या जखमी पोलिसाने एका चोरट्याला पकडून ठेवले. तोपर्यंत तेथे पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने टोळीतील चार जणांना पाठलाग करून पकडले. मात्र, त्यांचे चार साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडण्यात आलेल्यांकडून गॅस कटर, गॅस सिलिंडर, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी अवजारे, भिंत फोडण्यासाठीचे मोठे हत्यार असे साहित्य जप्त करण्यात आले. पळून गेलेल्या चार दरोडेखोरांच्या मागावर स्थानिक पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक निरीक्षक संतोष पाटील, अनिल लोहार, फौजदार सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, वंदू गिरे, संदीप गवारी, दीपक साबळे, स्वप्नील खेतले, आतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, अजय फल्ले, तात्या शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दोनच दिवसांपूर्वी पुण्यात अशाच पद्धतीने दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याने पोलिसांवर हल्ला केल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला होता.
दरम्यान, या घटनेनंतर दुसऱ्या रात्री पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकाच वेळेस संपूर्ण शहरात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ राबविले. अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त विवेक पाटील, डॉ. काकासाहेब डोळे आणि शहरातील चारही सहायक आयुक्त तसेच सर्व ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तसेच गुन्हे शाखेच्या उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनर आणि गुन्हे शाखेच्या नऊ पथकांचे प्रमुख हे इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांसह या ऑपरेशनसाठी रस्त्यावर उतरले होते.
यावेळी संशयित व्यक्ती, वाहने, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. एक तडीपार गुंड कारवाईचा भंग करून शहरात वावरताना आढळून आला, तर एका आरोपीकडून कोयता जप्त केला. १८७८ संशयित वाहनांची तपासणी करून १५ वाहने जप्त करण्यात आली. यावेळी रेकॉर्डवरील ७९५ आरोपींची तपासणी करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.