नदीपात्रातील वृक्षांना आलिंगन देऊन पुण्यात प्रथमच आंदोलन करण्यात येणार आहे.
अनुश्री भोवरे
TWEET@anu_BHOWARE
जागरूक पुणेकरांसह पर्यावरणतज्ज्ञांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही मुळा-मुठा नदीपात्रांच्या कॉक्रिटीकरणाचा अट्टाहास पुणे महापालिकेने कायम ठेवला आहे. काहीही करून नदीपात्रातील विकासकामांचे प्रकल्प रेटून नेण्याच्या हट्टाला पेटलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांना पर्यावरणप्रेमी पुणेकर आणि तज्ज्ञांनी अनोख्या पद्धतीने विरोध करायचे ठरवले आहे. ‘चिपको आंदोलना’पासून प्रेरणा घेत हजारो पुणेकर नदीपात्रातील वृक्षांना आलिंगन देऊन शहराच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच असे अभिनव आंदोलन करणार आहेत.
राजस्थानच्या बिष्णोई समूहाने १७३० च्या सुमारास जोधपूरच्या तत्कालीन महाराजांविरुद्ध ८४ खेड्यांतील लोकांनी एकत्र येत आंदोलन केले होते. त्याचबरोबर १९७३ मध्ये तत्कालीन उत्तर प्रदेशच्या (आताचे उत्तराखंड) हिमालय पर्वतरांगेतील वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या बेसुमार वृक्षांच्या कत्तलीविरोधात प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्या मार्गदर्शनाखाली 'चिपको आंदोलन' करण्यात आले होते. यापासून प्रेरणा घेत येत्या २९ तारखेला संध्याकाळी ५ पासून संभाजी उद्यान ते नदीपात्रातून गरवारे पुलापर्यंत 'चिपको आंदोलन' करण्यात येणार आहे. नदीपात्रांच्या रक्षणासाठी करण्यात येत असलेल्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुणेकरांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा तसेच विकासाच्या नावाखाली पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या प्रकल्पांत त्यांनी दुरुस्ती करावी, असे आवाहन या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.
या संदर्भात 'मिरर'सोबत संवाद साधताना शैलजा देशपांडे या जागरूक पुणेकर म्हणाल्या, "या आंदोलनात आम्ही नदीपात्रातील वृक्षांना आलिंगन देऊन विकासाच्या नावाखाली होत असलेल्या पर्यावरणाच्या -हासाला विरोध करणार आहोत. याबरोबरच आम्ही संगमवाडी रस्ता ते आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे रस्ता या मार्गावर दोन दिवसीय 'नेचर वॉक'चे आयोजन केले आहे. नदीपात्रांच्या कॉक्रिटीकरणाच्या नावाखाली होणाऱ्या हजारो वृक्षांच्या कत्तलीविरोधात पुणेकरांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.”
प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विकासाच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करून नैसर्गिकरित्या वाढलेले वृक्ष तोडणार आहेत. त्याऐवजी दुसऱ्या वृक्षांचे प्रत्यारोपण करणार असल्याचे ते सांगत आहेत. हा यावरील व्यवहार्य उपाय होऊच शकत नाही. मुळा-मुठा नदीपात्रातील नैसर्गिकरित्या वाढलेल्या वृक्षांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. नदीपात्रात नैसर्गिकरित्या वाढलेले हे वृक्ष दुर्मीळ प्रकारातील असून त्यांचे दुसरीकडे प्रत्यारोपण करता येणार नाही. नदीपात्रातील असे वृक्ष नैसर्गिक वनांप्रमाणे असतात. पर्यावरणाच्या साखळीतील ते महत्त्वाचा घटक आहेत. यामुळे हे वृक्ष काढून त्याऐवजी प्रत्यारोपित केलेल्या वृक्षांमुळे पर्यावरण साखळीचे संतुलन बिघडेल. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नदीपात्रातील या वृक्षरांगा अनेक दुर्मीळ पक्ष्यांचे निवासस्थान आहे. त्याचबरोबर या वृक्षांच्या संगतीने झुडुपे, गवत यांचेही सहजीवन फुलते. नदीपात्र ३८.०८ टक्क्यांनी कमी करण्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांचे मनसुबे आहेत. भविष्याच्या दृष्टीने हे धोकादायक ठरणारे आहे, असा इशारा देशपांडे यांनी दिला.
या सर्व बाबी लक्षात घेता आम्ही पुणे महापालिकेच्या भूमिकेविरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत. किमान १० ते १२ हजार पुणेकर या आंदोलनात सहभागी होऊन वृक्षांना आलिंगन देऊन महापालिकेच्या प्रकल्पांना विरोध दर्शवणार आहोत. अलीकडे, वेताळ टेकडी वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. तसाच प्रतिसाद या आंदोलनालाही मिळेल, असा विश्वास आम्हाला आहे. संवेदनशील आणि जबाबदार नागरिक या नात्याने जास्तीत जास्त पुणेकरांनी या 'चिपको आंदोलनात सहभागी व्हावे," असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.