समाधीच्या संवर्धनासाठी आता कृती समिती
मयूर भावे
ओंकारेश्वर मंदिरामागे नदीपात्रात असलेल्या कै. गंगाधर केळकर यांच्या समाधीच्या रक्षणार्थ पुण्यात ' केळकर समाधीस्थळ बचाव कृती समिती' ची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्यासह अरुणा केळकर, सत्यजित केळकर, रवींद्र रानडे, हेमचंद्र श्रोत्री, सुधन्वा रानडे, सुरेंद्र रानडे, शैलेंद्र दिवेकर, असीम फाटक, श्याम मोटे, मिलिंद आपटे उपस्थित होते.
नदीपात्रात कै. गंगाधर केळकर यांची मोठी समाधी आहे. ते राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर यांचे पिता होते. मात्र, सातत्याने त्या समाधीवर विविध प्रकारे अतिक्रमण करून तिचे मूळ रूप बदलण्याचा प्रयत्न होत असल्याने केळकर समाधीस्थळ बचाव कृती समितीची स्थापना करण्यात येत असून, त्यामागची भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली.
ओंकारेश्वर मंदिरामागे असलेली कै. गंगाधर केळकर यांची समाधी ही वास्तुउभारणीचा अप्रतिम नमुना असून, १९२८ साली ती बांधण्यात आली. ही समाधी संरक्षित व्हावी यासाठी केळकर कुटुंबीयांचा पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यांना एका विभागाकडून दुसऱ्या, तिसऱ्या विभागाकडे फिरावे लागत असून, प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये महाशिवरात्रीच्या दरम्यान या समाधीस्थळाचे रूपांतर शिवमंदिरात करण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे नंदीही बसविण्यात आला. डॉ. श्रीकांत केळकर यांनी आक्षेप घेतल्यावर तेथील अतिक्रमण संबंधितांनी स्वतःहून काढून टाकले होते. मात्र, नंदी अजूनही तसाच आहे. समाधीजवळ गुरे बांधून या परिसराचा गोठ्यासारखा वापर सुरू असल्याचा प्रकार जुलै २०२३ मध्ये उघडकीस आला. त्यानंतर समाधीस्थळाचे मूळ रूप आणि भावना बदलू नये असे आवाहन केळकर कुटुंबीयांनी पुणेकरांना केले होते.
समाधी वास्तुउभारणीचा अप्रतिम नमुना असलेली ही रचना केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर आणि त्यांचे बंधू भास्कर केळकर यांच्या कलाप्रेमाचा नमुनाही आहे. गंगाधर या शब्दाचा अर्थ शंकर असा असल्याने उभारणीच्या वेळेसच समाधीवर कलात्मकरीत्या पिंड (शिवलिंग) बसवलेले आहे. पानशेतच्या पुरातून वाचलेली समाधी अजून, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही केळकर कुटुंबीयांकडे आहेत. नदीपात्रातील इतरही सर्व महनीय पुणेकरांच्या समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी नागरिक आणि पुणे पालिकेला केले आहे. पालिकेकडे आणि शासनाच्या अन्य विभागांकडे पाठपुरावा करून समाधीला संरक्षित करण्यासाठी ही समिती पाठपुरावा करेल, विविध क्षेत्रातील नागरिकांचा, मान्यवरांचा त्यात समावेश असेल,असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.