A R Rahman : राॅकस्टार नव्हे, 'काॅप'स्टार!

संगीतकार ए. आर. रेहमान याला ओळखत नाही, असा भारतीय सापडणार नाही. ऑस्कर पुरस्कारविजेता संगीतकार असलेल्या रेहमानने पुण्यातील लाईव्ह शोदरम्यान वेळेच्या मर्यादेचा नियम मोडला म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी त्याचा कार्यक्रम बंद केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 3 May 2023
  • 01:22 am
राॅकस्टार नव्हे, 'काॅप'स्टार!

राॅकस्टार नव्हे, 'काॅप'स्टार!

वेळेची मर्यादा ओलंडल्याने ऑस्करविजेता संगीतकार ए. आर. रेहमानचा शो बंद करणारे बंडगार्डनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील म्हणतात, ‘मी केवळ कर्तव्य बजावले’

अर्चना मोरे

feedback@civicmirror.in

संगीतकार ए. आर. रेहमान याला ओळखत नाही, असा भारतीय सापडणार नाही. ऑस्कर पुरस्कारविजेता संगीतकार असलेल्या रेहमानने पुण्यातील लाईव्ह शोदरम्यान वेळेच्या मर्यादेचा नियम मोडला म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी त्याचा कार्यक्रम बंद केला. या संदर्भात ‘सीविक मिरर’ने मंगळवारी (दि. २) संपर्क साधला असता, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल पोलीस दलातील विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित संतोष पाटील यांनी ‘‘मी केवळ माझे कर्तव्य बजावले. या व्यतिरिक्त याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही,’’ अशी आपल्या ‘लो प्राेफाईल’ स्वभावाला साजेशी प्रतिक्रिया देत यावर बोलायचे टाळले.

पुणे स्टेशन परिसरातील ‘द मिल्स’ येथे रविवारी (दि. ३० मे) रेहमानचा लाईव्ह म्युझिक शो झाला. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या रात्री १० पर्यंतच्या वेळमर्यादेचे उल्लंघन रेहमानकडून झाले. यामुळे पाटील यांनी स्टेजवर जात रेहमानला आपला कार्यक्रम थांबवण्यास फर्मावले. या बाणेदार कृतीबद्दल पाटील यांचे समाज माध्यमांवर प्रचंड कौतुक करण्यात येत आहे. ‘‘रात्री १० नंतर मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या या डेडलाईनबाबत मी माझ्या कर्तव्याचे पालन केले,’’ असे पाटील यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.

पाटील यांनी थेट स्टेजवर जाऊन रेहमानला खडसावले नाही. त्यापूर्वी त्यांनी आयोजकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात ते म्हणाले, ‘‘वेळमर्यादेची कल्पना देण्यासाठी मी आधी आयोजकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मला स्टेजवर जावे लागले आणि रेहमान तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना कार्यक्रम थांबवण्यास सांगावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या वेळेची मर्यादा या कार्यक्रमाने ओलांडली असल्याने माझ्यासमोर कार्यक्रम थांबविण्याशिवाय पर्याय नव्हता.’’

 संतोष पाटील हे १९९५ मध्ये महाराष्ट्र पोलीस सेवेत रुजू झाले.

१९९८ मध्ये त्यांची गडचिरोली येथे बदली झाली. तेथे बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना  पोलीस दलातील ‘विशेष सेवा पदका’ने गौरविण्यात आले. त्यानंतर पाटील यांनी मराठवाड्यातील जालना आणि जाफराबाद पोलीस स्टेशनचे निरीक्षक म्हणून सेवा बजावली. २०१३ मध्ये त्यांची बदली लोणावळा येथे झाली. तेथे त्यांनी अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणले. नंतर बीड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या वर्षीच्या प्रारंभी बंडगार्डन पोलीस स्टेशनची जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली.

या शोसाठी रात्री १० पर्यंतचीच परवानगी असताना १० वाजून १० मिनिटे झाली तरी गायकांचा परफार्मन्स सुरूच होता. रेहमानच्या गाजलेल्या ‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गाण्याने शोचा समारोप होणार होता. त्यापूर्वी ‘छय्या छय्या,’ ‘दिल से रे’ यांसारखी गाणी सादर करून रेहमानने श्रोत्यांची मने जिंकली होती. वेळेची मर्यादा संपून १० वाजून १४ मिनिटे झाली तरी कार्यक्रम संपण्याचे नाव घेत नाही, हे पाहून पाटील स्टेजवर गेले. त्यांनी ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कारविजेत्या रेहमानला रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मोठ्या आवाजावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याचे सांगितले. हे ऐकताच रेहमानने पाटील यांच्या आदेशाचा मान ठेवत आपला कार्यक्रम तत्काळ थांबविला.

शोचे आयोजक डाॅ. हेरंब शेळके म्हणाले, ‘‘रेहमान हे केंद्र सरकारचा पद्मविभूषण तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कारविजेते संगीतकार आहेत. त्यांचा शो अशा रितीने मध्येच थांबविणे हे त्यांचा अनादर करणारे होते. इतर दुसऱ्या चांगल्या मार्गांनीही हा शो थांबविता आला असता. संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार  पडत असताना शेवटी असे घडायला नको होते.’’

या शोसंदर्भात रेहमानने ट्विटरवर एक क्लिप शेअर केली आहे. यासोबत तो लिहितो, ‘‘काल स्टेजवर आपण सर्वांनी राॅकस्टार क्षण अनुभवला का? मला वाटते की, आपण सर्वांनी तो क्षण अनुभवला. शोदरम्यान लाभलेल्या श्रोत्यांच्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो. अविस्मरणीय सायंकाळबद्दल पुण्याचे आभार.’’ विशेष म्हणजे, रेहमानने शेअर केलेल्या या व्हीडीओत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील स्टेजवर कार्यक्रम थांबवण्यास सांगत असल्याचेही फुटेज आहे. या व्हीडीओवर अनेक नेटकऱ्यांनी पाटील यांच्या कृतीचे समर्थन करणाऱ्या कमेंट केल्या. काहींनी या रेस्टाॅरेंट आणि पबवर ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली. काहींनी पोलिसांच्या कारवाईबाबत निराशा व्यक्त केली. ‘वंदे मातरम्’ या गीताने कार्यक्रमाचा शेवट होणार होता. मात्र ‘छय्या छय्या’ गाणे सुरू असतानाच पाटील स्टेजवर गेले आणि कार्यक्रम बंद केला.

या व्हीडीओवर प्रतिक्रिया देताना महेश लोंढे म्हणाले, ‘‘नियम हे सर्वांसाठी समान असतात. आम्ही ए. आर. रेहमान यांच्यावर प्रेम करतो. पण त्याचबरोबर नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे. सेलिब्रिटी असूनही नियम मोडल्यामुळे खंबीरपणे कारवाई करण्यात आली, हे इतरांसाठी प्रभावी उदाहरण आहे. पाटील यांनी दिलेले निर्देश पाळल्याबद्दल रेहमानचेही कौतुक करायला हवे.’’

 ‘‘कार्यक्रमाचा शेवट निराशाजनक होता. याबद्दल कोणालाही दोष देता येणार नाही. सर्वकाही शांततेत पार पडले. रेहमानने जबरदस्त  परफाॅर्मन्स दिला,’’ अशी प्रतिक्रिया आकाश जैन यांनी व्यक्त केली. दिनेश वैद्य म्हणाले, ‘‘रेहमान, तुम्ही आणि तुमच्या टीमने जबरदस्त परफाॅर्म केले. वेळ आणि आवाजाचे निर्बंध पाळण्याबाबत पुणे पोलिसांनी जी तत्परता या कार्यक्रमाबाबत दाखवली, तीच तत्परता राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांबाबतही दाखवावी.’’ ‘‘आयपीएल सामने रात्री १० वाजता संपतात की १० नंतर कोणताही आवाज न करता खेळले जातात, याबद्दल काही माहिती नसल्याची खोचक प्रतिक्रिया एका चाहत्याने व्यक्त केली.

 ‘‘आम्ही कार्यक्रम स्थळाच्या जवळच राहतो. येथे होणाऱ्या कार्यक्रमांचा आम्हाला नेहमीच त्रास होतो. पोलिसांनी नियमांचे पालन केल्याबद्दल त्यांचे कौतुक करावेसे वाटते. रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन या बाबतीत मात्र अपयशी ठरल्या,’’ असे त्यांनी  नमूद केले. कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील नागरिकांच्या समूहाने पोलिसांच्या कृतीचे समर्थन केले. ‘‘नियमांचे पालन करवून घेणे आवश्यक असते. पुणे पोलिसांनी आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली,’’ असे ते म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story