एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल १७ पंक्चर
# पुणे
ट्यूबलेस टायरमध्ये एकाहून अधिक पंक्चर असल्याचे भासवून लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. असाच एक प्रकार पुणे-नगर रोडवरील आर्मी गेटपुढे वडगाव शेरी येथे घडला असून त्याची १७ पंक्चर काढून फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत सौरभ अरविंदकुमार कौशल (वय ३२, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ही घटना २४ जुलै रोजी घडली.
पूर्वी रस्त्यावर खिळे टाकून वाहने पंक्चर करून लोकांचे नुकसान केले जात असे. खडकी ते शिवाजीनगर मार्गावर पूर्वी अनेकांना हा अनुभव आला होता. तशाच प्रकारे दुचाकी चालकांना फसविण्याचा नवा प्रकार अस्तित्वात आला आहे. आता ट्यूबलेस टायरमध्ये अनेक पंक्चर असल्याचे भासवून लोकांकडून पैसे उकळले जात आहेत. वडगाव शेरीतील घटनेत दुचाकी पंक्चर असल्याचे भासवून एका पाठोपाठ १७ पंक्चर काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
फिर्यादी हे पत्नीचे वैद्यकीय रिपोर्ट आणण्याकरीता दुचाकीवरून जात असताना दोघे जण पाठीमागून दुचाकीवरून आले. त्यांनी तुमची गाडी पंक्चर असल्याचे सांगितले. खाली उतरून पाहिले तर त्यांना गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे जाणवले. त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या पंक्चर काढणार्याकडे गाडी नेली. त्यांनी एका पाठोपाठ एक पंक्चर असल्याचे भासवत टायरला भोके पाडली. एकूण १७ पंक्चर काढून त्यांच्याकडून १ हजार ७०० रुपये घेतले. या प्रकारात गाडीच्या टायरचे नुकसान केले. पोलिसांनी गुन्हा दखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक आळेकर तपास करीत आहेत.
विवाहितेच्या आत्महत्येबद्दल तिघांना अटक
सुनेला नीट स्वयंपाक करता येत नाही म्हणून मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल कारागृह पोलीस हवालदारासह तिघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. पोलीस हवालदार माणिक भवार, बाळू भवार, शाहाबाई भवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अश्विनी बाळू भवार (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत अश्विनीची आई सुनंदा परमेश्वर पवार (वय ४७, रा. पवडुळ, जि. बीड) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती, सासू, सासरे व दिरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
हा प्रकार २०१५ पासून २८ जुलै २०२३ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिक भवार हे येरवडा कारागृहात हवालदार असून त्यांचा मुलगा बाळू आणि अश्विनी यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. अश्विनीला किरकोळ कारणावरून मारहाण, शिवीगाळ केली जाई. तुला नीट स्वयंपाक करता येत नाही, भांडी घासता येत नाहीत म्हणून वारंवार मानसिक व शारीरिक छळ होत असे. या छळाला कंटाळून अश्विनी हिने २८ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.