वाकड नव्हे खड्डे-चिखल ॲनेक्स
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
शहरातील झपाट्याने विकसित झालेल्या पिंपळे सौदागर, वाकड परिसरानंतर आता ताथवडे-पुनावळे हा भाग गेल्या काही वर्षांपासून वाकड ॲनेक्स म्हणून नावारूपाला येत आहे. परंतु, येथील खड्डे, चिखल-पाणी साठणे, घाणीचे साम्राज्य आदींमुळे या भागाची नवी ओळख 'खड्डे-घाण-चिखल ॲनेक्स' अशीच होऊ लागली आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावर वाकड-हिंजवडी भाग आता पूर्णत: विकसित झाला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतचा ताथवडे-पुनावळे हा भागही तेवढ्याच झपाट्याने विकसित होत आहे. येथील बांधकाम व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांना येथील सदनिका वाकड ॲनेक्स नावाखाली विकल्या आहेत. तसेच अजूनही अनेक प्रकल्प याच नावाखाली विकले जात आहेत. परंतु, येथील घाणीचे साम्राज्य, ठिकठिकाणी गटारांचे, पावसाचे पाणी साठणे, रस्त्यावर चिखल आणि पुणे-बंगळुरू महामार्गाखाली असलेले चार अंडरपास हे कायमच या-ना-त्या कारणाने तुंबलेले असतात. वाहनांच्या रांगा, पावसाचे साठलेले पाणी, गटारांची झाकणे निघून गेल्याने त्यातील दूषित पाणी रस्त्यावर येणे, जड वाहने याच भागातून जात असल्याने पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्यांची खड्ड्यांनी झालेली चाळण हा आता नित्याचा भाग बनला आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील अंतर्गत नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक हाउसिंग सोसायटीने आपापल्या समित्या स्थापन करून त्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले. कालांतराने पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन सुरू झाल्यावर त्यांनी सर्व सोसायटींच्या चेअरमन-सेक्रेटरींना एकत्रित करून त्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप करून त्यावर समस्यांची आणि अडीअडचणींची सोडवणूक करण्यासाठी उपायांची देवाण-घेवाण सुरू झाली.
यापुढे जाऊन प्रत्येक परिसरातील नागरिकांना आसपासच्या नागरिकांची ओळख आणि मदत व्हावी म्हणून स्वतंत्र ग्रुपही तयार झाले आहेत. अशा प्रयत्नांचा भाग नुकतेच 'ताथवडे-पुनावळे ट्रॅफिक समस्या' असा एक ग्रुप तयार झाला असून, या भागातील नागरिकांनी अवघ्या काही दिवसात येथील समस्या या ग्रुपवर पोस्ट करीत समस्या उजेडात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या भागात अनेक नवे बांधकाम प्रकल्प उभे राहात आहेत. परंतु, येथे ये-जा करण्यासाठी प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि पर्यायी रस्ते नसणे ही समस्या आता वाढत्या नागरीकरणामुळे प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
हिंजवडी-वाकड-भूमकर चौकातील वाहतूक कोंडीमुळे अनेकजण महामार्गावरून आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवेश करण्यासाठी पुनावळे, ताथवडे आणि यापुढील अन्य दोन अंडरपासचा वापर करतात. परंतु, या अंडरपासच्या आजूबाजूचा परिसर घाणीने, चिखलाने, साठलेल्या पाण्याने आणि खड्ड्यांनी व्यापला असून, स्थानिक राजकीय नेते आणि महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे. महापालिकेत गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय राज आहे. नगरसेवकांची मुदत संपल्याने अधिकारी हेच पदाधिकारी असल्याने नागरिकांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यातच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महापालिका येथील रस्त्यांच्या समस्यांबाबत एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.
अरुंद अंडरपासमुळे कोट्यवधी रुपये बांधकाम व्यावसायिकांना देऊन येथे सदनिका घेणाऱ्यांची घोर फसवणूक झाल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांकडून आता येऊ लागली आहे. पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे येथे कर्मचारी नेमण्यात आलेले नसतात. जर नेमलेच तर ते ठराविक कालावधीनंतर येथून निघून जातात. त्यामुळे आम्हाला वाहतूक समस्येचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया क्षितिज खानोलकर यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना व्यक्त केली आहे.
येथील समस्यांबाबत आम्ही वारंवार ट्विटरच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहोत. त्याचबरोबर आम्ही प्रत्यक्ष संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना भेटून आमच्या समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. परंतु, येथील समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. पावसाळ्यात येथील समस्या वाढल्या असून, रोगराई, घाण, चिखल, वाहतूक कोंडीने ताथवडे-पुनावळे भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत, अशी प्रतिक्रिया सौरभ कांबिरे यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना व्यक्त केली आहे. ताथवडे भागातील एका अंडरपासमध्ये कमरेपेक्षा जास्त पाणी साठले असून, त्यातूनच धोकादायक पद्धतीने कार आणि अन्य वाहने प्रवास करीत असल्याचा एक जुना व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.