राज्यात एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही
#पिंपरी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आरक्षण समन्वय समिती नव्याने संघर्ष करण्यासाठी सज्ज झाली आहे. आम्हाला ओबीसीचे आरक्षण नको आहे, आमचा लढा स्वतंत्र आरक्षणासाठी आहे. आमची मागणी मान्य झाली नाही तर एकाही मंत्र्याला रस्त्यावरून फिरू देणार नसल्याचा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे पाटील यांनी शनिवारी दिला आहे. येत्या १ जून रोजी समिती मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर उपोषण करणार असल्याचेही जावळे यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होणार असल्याची चिन्हे आहेत. मराठा आरक्षण समन्वय समितीतर्फे शनिवारी आकुर्डी येथे मराठा आरक्षण एल्गार परिषद घेण्यात आली. या परिषदेत आरक्षणासाठी समितीची येत्या काळातील रणनीती ठरवण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे पाटील यांनी आमची मागणी मान्य झाली नाही तर मंत्र्यांचे घराबाहेर पडणे अशक्य होणार असल्याचे सांगितले आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यास राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जागरण गोंधळ घातला जाणार आहे. तसेच, येत्या १ जूनला मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा जावळेंनी दिला आहे. यावेळी सुधाकर माने, धनाजी येळकर यांच्यासह विविध जिल्ह्यातील समन्वयक उपस्थित होते.
सुभाष जावळे म्हणाले, संघर्षातून आणि त्यागातून मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आले. आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज एल्गार परिषद झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत.
मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण नको, आम्हाला स्वतंत्र आरक्षण हवे आहे. राज्य सरकारने यावर विचार करावा, वेळ पडल्यास घटना बदलावी. त्यांना कुठलीच अडचण येणार नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार आहे. ते पुढे म्हणाले की, संभाजी महाराज यांची जयंती होताच जिल्ह्या-जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या घरासमोर जागरण गोंधळ घालणार आहोत. तरीही सरकारला सद्बुद्धी नाही मिळाली तर मात्र कुठल्याही मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर, मतदारसंघात फिरू देणार नाही. त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.