नो रीपिट प्लीज, सीएम सभेपूर्वी ‘ओआरएस’...

नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या शासकीय सोहळा कार्यक्रमात १४ श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. अनेकजण जखमी झाले होते. उन्हातान्हात भक्तांना सुरक्षेच्या कारणाने पाणीही न मिळाल्याने अनेकजण तडफडून गतप्राण झाले. त्याच घटनेची शुक्रवारी पुनरावृत्ती मुख्यमंत्र्यांच्या पिंपरीतील सभेत होऊ नये यासाठी कधी नव्हे ती खबरदारी घेण्यात आली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Sat, 17 Jun 2023
  • 01:20 am
नो रीपिट प्लीज, सीएम सभेपूर्वी ‘ओआरएस’...

नो रीपिट प्लीज, सीएम सभेपूर्वी ‘ओआरएस’...

खारघरच्या उष्माघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पिंपरी सभेत वाटली जलसंजीवनी

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या शासकीय सोहळा कार्यक्रमात १४ श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. अनेकजण जखमी झाले होते. उन्हातान्हात भक्तांना सुरक्षेच्या कारणाने पाणीही न मिळाल्याने अनेकजण तडफडून गतप्राण झाले. त्याच घटनेची शुक्रवारी पुनरावृत्ती मुख्यमंत्र्यांच्या पिंपरीतील सभेत होऊ नये यासाठी कधी नव्हे ती खबरदारी घेण्यात आली होती.   

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी लोकांना तासभर वाट पाहायला लावून  ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली खरी; पण संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अगोदरच  कार्यक्रमाला उपस्थित आणि येणाऱ्या नागरिकांना ‘ओआरएस’ची पाकिटे देण्यात आली. या अगोदर पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या कुठल्याही राजकीय किंवा शासकीय कार्यक्रमात नागरिकांची एवढी काळजी घेण्यात आलेली नव्हती. अडीच वाजता सुरू होणारा कार्यक्रम साडेतीन वाजता सुरू झाला. नागरिकांना चक्कर येऊ शकते याची खबरदारी घेऊन ‘ओआरएस’चे वाटप करण्यात आले. 

 शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या घराच्या जवळच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला येणाऱ्या आणि उपस्थिती लावणाऱ्या नागरिकांची विशेष काळजी घेण्यात आली. थंड पाण्याचीही खास व्यवस्था करण्यात आली होती. 

दरम्यान आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बेबनाव असल्याच्या वृत्ताला फाटा दिला. "देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मजबूत आहोत. 

काही काळजी करू नका. एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर परिणाम होणार नाही. ही युती एवढी कच्ची नाही. आम्ही आणि देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहोत, असे  विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी लक्ष्मण जगताप, उमा खापरे, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पालिका आयुक्त शेखर सिंह यासह इतर नागरिक, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत मी नालेसफाई झाली की नाही हे अगदी स्पॉटवर जाऊन बघतो. राज्यात कुठंही गाडी थांबव म्हटलं तरी रस्त्यावर थांबून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पहिला आहे काय, असे एकनाथ शिंदे यांनी म्हणत अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. पुढे ते म्हणाले, कोरोना काळातील सर्व निर्बंध उठवले. घाबरून घाबरून राहिलो असतो तर कोरोनाने आपल्याला धरलं असतं. आपण राज्यात सर्व सण-उत्सव खुले केले. त्यामुळे कोरोना पळून गेला.

दरम्यान, खारघरच्या घटनेनंतर,  दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले होते. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले  होते. 

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी आप्पासाहेब यांचे लाखो अनुयायी कार्यक्रमाला आले होते. मात्र, हे लाखो अनुयायी खुल्या मैदानात होते. त्या दिवशी तापमान ४२  डिग्री होते. त्यामुळे उष्माघाताने १४  जणांचा बळी गेला. हा संपूर्ण कार्यक्रम सकाळी १० वाजता होता. या कार्यक्रमासाठी मुंबईसह राज्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिक हे जवळपास ४-५ तास उन्हात बसलेले होते.   या कार्यक्रमादरम्यान तब्बल ६०० जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे निष्पन्न झाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story