महिलांना फसवणारा नायजेरियन रॉबिनहूड गजाआड
#हडपसर
श्रीमंत महिलांचा विश्वास संपादन करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका टोळीतील नायजेरियन गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. रॉबिनहूड ओकोह (वय ३९, रा. एस. एफ. संत गृह, सुनील डेअरीजवळ, दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अमेरिका, लंडनमध्ये डॉक्टर किंवा पायलट असल्याची बतावणी करत फेसबुकवर महिलांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवायची. चॅटिंग करून महिलांना मैत्रीच्या जाळ्यात ओढायचे. काही दिवसांनी ‘मी दागिने, मौल्यवान पार्सल पाठवित आहे’, असे मोबाईलवर सांगायचे. त्यानंतर ते पार्सल कस्टम विभागाने पकडले आहे. ते सोडविण्यासाठी बँक खात्यात पैसे पाठवावे लागतील, असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करायची, ही रॉबिनहूडची कार्यपद्धती आहे. याच पद्धतीने एका महिलेला ११ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एका विदेशी आरोपीला सायबर पोलिसांना अटक केली. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेची ११ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पुणे सायबर पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या इन्स्टाग्राम आयडी, व्हॉट्सअॅप क्रमांक आणि बँक खात्यांची माहिती घेतली. तांत्रिक तपास करून आरोपीचा ठावठिकाणा हा दिल्लीत असल्याचे समोर आले. त्यानुसार आरोपी रॉबिनहूड ओकोह याला नवी दिल्लीतून अटक करण्यात आली.
या नायजेरियन आरोपीकडून चार मोबाईल फोन, एक हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, १५ सिमकार्ड आणि सात डेबिट कार्ड जप्त केले आहेत. लष्कर न्यायालयाने आरोपीला २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त विजय पळसुले आणि पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनुराधा भोसले, पोलिस अंमलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, बाबासाहेब कराळे, नीलेश लांडगे, सोनाली चव्हाण, संदेश कर्णे, शाहरुख शेख, नितीन चांदणे यांनी ही कारवाई केली.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.