नीरा पिताय की विष
नितीन गांगर्डे
उन्हाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच उष्णतेच्या त्रासापासून वाचण्यासाठी अनेकजण आरोग्यदायी नीरा घेतात. या दिवसांत नीरा विक्री केंद्रावर लोकांची रांग लागते ती याच कारणासाठी.
मात्र, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी भेसळयुक्त नीरा विकली जात असल्याच्या तक्रारी आहेत. येथे अनेक विक्रेत्यांकडे नीरा विक्रीचा परवाना नसताना, अशी केंद्रे अनधिकृपणे चालवली जात आहेत. नीरेच्या नावाखाली दुसरेच पेय देऊन ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अशा केंद्रांवर कारवाई करून ग्राहकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवावा अशी तक्रार चंद्रशेखर नीरा उत्पादक औद्योगिक संस्थेने राज्य उत्पादन शुल्क आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक देहूरोड पोलीस स्टेशन यांच्याकडे केली आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सरकारमान्य नीरा विक्री केंद्र असा फलक लावलेली किमान २५ केंद्रे अनधिकृत असल्याची माहिती मावळ तालुक्यातील महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने प्रमाणित केलेल्या चंद्रशेखर नीरा उत्पादक औद्योगिक संस्थेने दिली.
नीरा तयार होते ती शिंदीच्या झाडातील रसापासून. एका झाडापासून साधारणपणे एक ते पाच लिटर नीरा मिळते. नीरा पेयाचे गुणधर्म ठराविक तासापर्यंत असतात. उन्हाळ्यात नीरा पेयाची जेवढी मागणी असते त्या प्रमाणात नीरा तयार होत नाही. आता ही नीरा येते कुठून हा प्रश्न निर्माण झाला आहे. नीरेच्या नावाखाली घातक आणि विषारी रसायने नीरेचा कृत्रिम स्वाद मिसळून तयार केली जाते.
वरून शुद्ध नीरा हे आरोग्यदायी आणि स्वास्थ्यवर्धक थंड पेय आहे. ते रक्त, पचनशक्ती वाढवते, तसेच मूत्राशय, पोटातील विकार दूर करते. तसेच ते गर्भवती महिलांना लाभदायक आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात केंद्रांचे पेव फुटले आहे.
या संस्थेचे उपाध्यक्ष भीमाशंकर भंडारी म्हणतात की, आम्ही काही केंद्रांवर जाऊन त्यांच्याकडे परवाना आहे का अशी चौकशी केली. या वेळी अनेकांना नीरा विक्रीसाठी परवाना लागतो याचीच माहिती नाही. तुम्ही नीरा कुठून आणता असे विचारल्यावर मी स्वतः झाडाचा रस काढून आणतो असे एकाने सांगितले. मात्र झाडाची नीरा अशी कोणालाही काढता येत नाही. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना घ्यावा लागतो. हाच विभाग झाडावरून नीरा काढण्यासाठी विविध संस्थांना परवाना देतो. ही संस्था त्या भागातील नीरा विक्री केंद्राला नीरा विक्रीचा परवाना आणि नीरा देते. परंतू मावळ तालुक्यात कोणताही परवाना नसलेली अनेक विक्री केंद्रे असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारचे भंडारी यांनी चित्रीकरण केले आहे. त्यांनी राज्य उत्पादन शुल्क आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. अनेक विक्रेते नीरा म्हणून जे काही विकतात त्याला नीरा म्हणताच येणार नाही असे ते सांगतात.
वडगाव मावळ तालुक्यात चंद्रशेखर नीरा उत्पादक औद्योगिक संस्था मर्यादित ही १९९७ सालापासून कार्यरत आहे. तेव्हापासून त्यांच्याकडे नीरा विक्रीचा आणि उत्पादनाचा परवाना आहे. या तालुक्यात आमची एकमेव संस्था आहे. ही संस्था छोट्या विक्रेत्यांना नीरा पुरवते. त्यांना विक्री परवाना आमच्यासारख्या संस्था देतात. आम्ही परवाना दिलेली फक्त पाच केंद्र आहेत. बाकीचे सर्व केंद्रे अनधिकृत आहेत असे भंडारी म्हणतात. ते सांगतात की, अशा विक्रेत्यांची प्रशासनाकडे तक्रार करूनही काहीच कारवाई होत नाही. प्रशासकीय अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. अनेक नीरा विक्रेते आमच्या संस्थेचा परवाना आहे असे सांगून ग्राहकांना विक्री करतात. ग्राहकांच्या आरोग्याशी सुरू असेलला हा खेळ थांबला पाहिजे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी.
पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते अनिल भांडवलकर याबाबतचा अनुभव सांगताना म्हणतात की, मी पुणे-मुंबई जुना महामार्गावरून जात असताना एका केंद्रावर नीरा घेतली. ती पिल्यानंतर मला जुलाबाचा त्रास होऊ लागला. अधिक चौकशी केली असता तेथे भेसळयुक्त नीरा मिळते हे समजले. अशी भेसळयुक्त नीरा मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तातडीने यावर कारवाई करण्याची गरज आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.